पुणे: पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना या रोगामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही चिंताजनक आहे. असं असताना पुण्यातील उरुळी देवाची इथं पाण्यासाठी नागरिकांनी तुफान गर्दी केल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. एप्रिल महिन्यातच या परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळं इथं पाण्याचे टॅंकर सुरु करण्यात आले आहेत. फुरसुंगी परिसरातील उरुळी देवाची इथं पाण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाल्याचं पाहायला मिळालं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा यामुळं उडालेला पाहायला मिळाला.




या व्हिडीओत दिसत आहे की, लोक पाण्याच्या टॅंकरच्या भोवती पाण्यासाठी झुंबड करत आहेत.  पाणी घेण्यासाठी स्त्री-पुरुष आबालवृद्ध टँकर भोवती जमा झाले आहेत. अनेकांनी मास्क न लावता पाण्यासाठी टँकरला गराडा घातला आहे. सोशल डिस्टन्सचा फज्जा तर उडालाच मात्र कोरोनाव्हायरसच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची ऐसीतैसी झालेली यानिमित्ताने पाहायला मिळालं. यामुळं कोरोना प्रादुर्भाव कमी होण्याऐवजी आणखी पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्रात मुंबईनंतर पुण्यात कोरोनाचा सर्वाधिक कहर आहे. पुणे जिल्ह्यात 19 कोरोनाबाधित आहेत. तर पुणे मनपा क्षेत्रात 734 कोरोनाबाधित आहेत. यापैकी 54 लोकांचा मृत्यू झाला आहे.
पुणे पोलीस दलातही कोरोना विषाणूचा शिरकाव झाला असून तीन पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यापूर्वी फरासखाना पोलीस स्टेशनच्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या इतर पोलीस कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी केली असता आणखी दोघे कोरोना पॉझिटिव्ह सापडले. या सर्वांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. पोलीस दलातील तिघांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.