पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विधान परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. अजित पवारांच्या नेतृत्वाखालील समितीने उद्धव ठाकरे यांची शिफारस करणं चुकीचं आहे. वरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेच्या जागेवर भाजप राजकारण करत असल्याचा आरोप केला जात आहे, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे उद्धव ठाकरेंना 28 मेपर्यंत कोणताच धोका नाही. त्याला आणखी वेळ असताना एवढी घाई का?  राज्यपाल कोट्यात निर्णय एका दिवसात निर्णय घेता येईल, असंही ते म्हणाले.


ते म्हणाले की, 28 मे पर्यंत उद्धव ठाकरे यांना धोका नाही. आमचा त्यांना विरोध नाही किंवा त्याला हरकत देखील नाही. मात्र महाविकासआघाडीकडून राजकारण सुरू असल्याचा टोला त्यांनी लगावला. पंतप्रधान केअरला निधी पाठवण्याबाबत विचारलं असता ते म्हणाले की, आम्ही काही पाकिस्तानच्या पंतप्रधानांना पैसे पाठवायला सांगितले का?. सी एस आर निधीतून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पैसे देता येत नाहीत हे यांना पंधरा दिवसांनी शहाणपण सुचलं. मग डिजास्टर मॅनेजमेंट अकाऊंटला देता येतात हे यांना केंद्राकडून कळलं. ज्ञानच कमी आहे तुम्हाला. ताळमेळच नाही तुमच्यामध्ये. नाचता येईना अंगण वाकडे अशी स्थिती आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

ते म्हणाले की, केंद्र सरकारच्या पी एम रिलिफ फंडला पैसे द्यायला हरकत नाही. केंद्र सरकारने सर्वाधिक साहित्य महाराष्ट्राला दिलंय. ते म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने परप्रांतीय कामगारांना स्वतःच्या बसेसमधून त्यांच्या राज्यांमधे पोहचवावं. महाराष्ट्रातून उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेश या राज्यांमधे कामगारांना पोहोच करावं. ते करताना सोशल डिस्टन्सिंगचा उपयोग करुन बसमध्ये कामगारांना बसवण्यात यावं आणि त्यांच्या गावांमध्ये पोहचवण्यात यावं, असंही ते म्हणाले.

ते म्हणाले की, लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यासाठी निवृत्त सैनिकांची मदत घेण्यात यावी. होमगार्ड आणि एसआरपी रस्त्यांवर आणता येईल का याचा विचार व्हावा. ज्या ठिकाणी जास्त रुग्ण आढळलेत तिथं लोकांना दहा दिवसांसाठी पुरेल एवढ्या जीवनावश्यक वस्तूंची कीट्स पुरवण्यात यावीत. लोक दुध घेण्यासाठी देखील बाहेर पडू नयेत, असंही ते म्हणाले.