पुणे : दोन महिन्यांच्या लॉकडाउननंतर एक जूनपासून पुण्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र पहिल्याच दिवशी पुणेकरांना रस्ते खोदाईमुळे मनस्तापाला सामोरं जावं लागतंय. कारण महापालिकेकडून ड्रेनेज आणि पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन बदलण्यासाठी संपूर्ण शहरात रस्ते खोदून ठेवण्यात आलेत. 


शहरातील प्रमुख रस्ते असलेल्या लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता यासह शहरातील विविध भागात तब्बल 40 किलोमीटरचे रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. या कामासाठी तब्बल 45 ते 50 कोटी रुपयांच्या निविदा देखील काढण्यात आल्या आहेत. एप्रिल महिन्यात पुण्यात लॉकडाऊनला सुरुवात झाल्यानंतर या कामांना सुरुवात झाली होती आणि ही कामं 31 मे पर्यंत पूर्ण करायची होती. मात्र संथ गतीने सुरू असलेली ही कामं पूर्ण होण्यास 15 जूनपर्यंतचा वेळ लागेल असं महापालिकेच्या वतीने सांगण्यात आलंय. 


जे रस्ते खोदून ठेवण्यात आले आहे त्या रस्त्यावर शहरातील प्रमुख बाजारपेठा आहेत. त्यामुळे आजपासून पुढे काही प्रमाणात अनलॉक होत असल्यामुळे या भागातील दुकाने उघडण्यात आली आहे. दोन महिन्यांपासून घराबाहेर पडता न आलेल्या नागरिकांनीही खरेदी करण्यासाठी गर्दी केल्याचे चित्र दिसत आहे. परंतु या भागातील रस्ते खोदलेली असल्यामुळे या नागरिकांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागते. वाहतूक विभागातर्फे हे शहरातील प्रमुख रस्ते बंद करू नये यासाठी महापालिका प्रशासनाला वारंवार सांगण्यात आले, मात्र दोन महिन्याच्या कालावधीनंतर देखील या रस्त्याचे काम अजूनही संपले नाही. त्यामुळे या रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी सोडवताना वाहतूक पोलिसांना मोठी कसरत करावी लागते


पुण्यातील शिवाजी रस्त्याच्या आसपास मंडई तुळशीबाग, अप्पा बळवंत चौक यासारखे प्रमुख मार्केट आहेत. त्यामुळे या परिसरात नागरिकांची प्रचंड गर्दी होताना दिसते. पण या भागातील रस्ते खोदून ठेवल्यामुळे या परिसरात वाहनांची कोंडी होत असल्याचे चित्र आहे, वाहने पार्क करायची कुठे असा प्रश्न या ठिकाणी येणाऱ्या ग्राहकांना पडला आहे


जिथं खोदकाम करण्यात आलंय तिथं कोणत्याही प्रकारचे बोर्डस लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे उद्या जेव्हा अनलॉकला सुरुवात होईल तेव्हा अनेक ठिकाणी वाहतूककोंडी पहायला मिळण्याची शक्यता आहे. एकाचवेळी रस्ते खोदाईच्या निविदा मंजुर करण्याचं कारण काय असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय.



शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर अशाप्रकारे खोदकाम करणं गरजेचं होतं का ? ही कामं सुरू असताना काही अनुचित घटना घडली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न आता सर्वसामान्य पुणेकरांकडून विचारला जातोय.  आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तर ही विकास काम केली जात नाही ना असा प्रश्न देखील पुणेकर नागरिक विचारताना दिसत आहे. तुर्तास पुढचे आणखी काही दिवस तरी पुणेकरांची रस्त्याच्या खोदकाम आतून सुटका होणार नाही असेच चित्र दिसते.