पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधील भाजप आमदार महेश लांडगे हे पुन्हा एकदा चर्चेत आलेत. मुलीच्या लग्न कार्यक्रमात कोरोना नियमांची पायमल्ली केल्याप्रकरणी अखेर त्यांच्यासह साठ जणांवर गुन्हा दाखल झालाय. यात पिंपरी चिंचवड महापालिकेचे अधिकारी सुनील बेळगावकर हे पण डीजेच्या तालावर थिरकले असल्याचं समोर आलंय. सामान्यांवर कारवाईचा बडगा उगरणारी पालिका अधिकारी बेळगावकर यांच्यावर कारवाई करण्यासाठी एखाद्या तक्रारदाराची वाट पाहत आहे.
आमदार लांडगे यांच्या मुलीचा विवाहसोहळा 6 जूनला पार पडणार आहे. यासाठी त्यांनी अलिशान पत्रिका ही छापली आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रण दिलेली पत्रिका सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. अशातच आमदारांच्या घरासमोर लग्नापूर्वी काही कार्यक्रम पार पडत आहेत. रविवारी मांडव डहाळेचा कार्यक्रम होता, यासाठी जंगी नियोजन आखण्यात आलं होतं. वाजंत्री, बैलजोड्या आणि बैलगाड्या सजवण्यात आल्या होत्या. तेव्हा स्वतः आमदार लांडगे यांनी भंडाऱ्यात नाहून बेफाम नृत्य केलं.
या सोहळ्यात अपवाद वगळता आमदारांसह सगळेच विनामास्क वावरत होते, सोशल डिस्टनसिंगचा तर पुरता फज्जा उडाला होता. रात्री पार पडलेल्या या जंगी कार्यक्रमाची कोणाला कानोकान खबर नव्हती. मात्र काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर हे व्हिडीओ शेअर केले. आता ते मीडियापर्यंत पोहोचले नसते तर नवलच. अपेक्षेप्रमाणे त्याची बातमी झाली. व्हिडीओ पाहून आमदारांसह हितचिंतकांना धक्का बसला. त्यातच आमदार लांडगे यांच्या सोबत पालिकेचे अधिकारी सुनील बेळगावकर यांनीही नृत्य केल्याचं समोर आलं आणि पालिका वर्तुळात चर्चेला आणखीनच उधाण आलं.
आमदार महेश लांडगे यांच्याकडे भाजपचे शहराध्यक्ष पद असल्याने ते शहरवासीयांना कोरोना नियम पाळावे, यासाठी अनेकदा जनजागृती करतात. मधल्या काळात तर ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत होता. ते आमदारांनी प्रशासनाला धारेवर ही धरलं. लोकप्रतिनिधी म्हणून त्याने हे करायलाच हवं होतं. पण मुलीच्या विवाहसोहळ्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात सर्व काही विसारल्याच दिसून आलं.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आयर्नमॅन कृष्ण प्रकाश यांच्या कार्यक्षेत्रात कोरोना नियमांची ऐशीतैशी झाली. याच्या बातम्या प्रसारित होताच, आमदारांसह साठ जणांवर अखेर गुन्हा दाखल झाला. मात्र ज्या पालिकेवर कोरोना नियमांची पायमल्ली केल्यानंतर कारवाई करण्याची;जबाबदारी आहे. ते त्यांच्याच पालिका अधिकाऱ्यावर कारवाईसाठी एखाद्या तक्रारदाराची वाट पाहत आहेत.