पुणे : पुण्यातील कॉग्निझंट कंपनीने शंभरहून अधिक कर्मचाऱ्यांना एकाच वेळी नोकरीवरुन काढून टाकण्याच्या नोटीसा पाठवल्या आहेत.


कर्मचाऱ्यांचा विरोध थंड करण्यासाठी कंपनीनं पुढच्या चार महिन्यांसाठी कर्मचाऱ्यांना कंत्राटावर कामावर ठेवलं आहे. मात्र हे प्रकरण न्यायालयात असल्यानं कर्मचाऱ्यांनी काही प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. कर्मचाऱ्यांनी कामगार आयुक्तालयाचा दरवाजा ठोठावला आहे.

ही परिस्थिती केवळ एकाच कंपनीपूर्ती नसून पुण्यात सध्या एकामागोमाग एक आयटी कंपन्या कर्मचाऱ्यांना अशा नोटीसा पाठवत असल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जास्तीचा पगार द्यावा लागतो, याउलट नव्या कर्मचाऱ्यांकडून कमी पगारातही कामं करुन घेता येतात, म्हणून कंपनीनं हे पाऊल उचलल्याचं फोरम फॉर आयटीनं म्हटलं आहे.

पर्सिस्टंट, टेक महिंद्रा, विप्रो अशा अनेक कंपन्यानी कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. ही कपात कधी परफॉर्मन्सचं, तर कधी आर्थिक मंदीचं कारण देऊन केली जाते

दरम्यान, पुढच्या 2 वर्षांत अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ शकते अशी भीती फोरम फॉर आयटीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.