Shankar Jagtap :  दिवंगत लक्ष्मण जगताप कुटुंबीय फोडण्यासाठी परकीयांसह स्वकीयांनीही हल्ला केला. ही वेळ दुश्मनांच्या कुटुंबियांवरही येऊ नये, अशी खंत दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांचे बंधू शंकर जगतापांनी व्यक्त केली. लक्ष्मण जगतापांच्या पत्नी अश्विनी जगतापांना आमदार करण्यासाठी ज्यांनी अहोरात्र मेहनत घेतली त्यांचे आभार मानताना शंकर जगतापांनी स्वकीयांनी केलेल्या हल्ल्याचं दुःख कायम स्मरणात राहिल असं सांगितलं. नवनिर्वाचित आमदार आणि वहिनी अश्विनी जगताप या मंचावर असतानाच त्यांनी हे वक्तव्य केल्यानं चर्चांना उधाण आलेलं आहे. 


शंकर जगतापांचा रोख नेमका कोणाकडे होता?, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. कारण लक्ष्मण जगतापांच्या निधनानंतर रिक्त जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीसाठी शंकर जगताप ही तीव्र इच्छुक होते. दिवंगत लक्ष्मण जगतापांनी त्यांच्यानंतर बंधू शंकरच राजकीय वारसा सांभाळतील, असं पक्षातील वरिष्ठासमोर अनेकदा खासगीत बोलून दाखवलं होतं. मात्र ऐनवेळी वहिनी अश्विनी यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निश्चय केला. त्यावेळी कुटुंबात वहिनी आणि दीरात राजकीय वारसावरून वाद असल्याचं दिसून आलं होतं. 


भाजपने अश्विनी जगतापांची उमेदवारी जाहीर करत चिंचवड विधानसभा प्रचार प्रमुख म्हणून शंकर जगतापांची निवड करत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आभार मेळाव्यात शंकर जगतापांनी कुटुंब फोडण्यासाठी परकीयांसह स्वकीयांनी हल्ला केल्याचं आणि हे दुःख आयुष्यभर स्मरणात राहिल, असं वक्तव्य केल्यानं त्यांचा रोख नेमका कोणाकडे होता?, याबाबत चर्चांना उधाण आलेलं आहे. पण पुढं बोलताना, आत्तापर्यंत भाऊ एकटे होते आता मात्र मी आणि वहिनी असं दोघे मिळून शहराचा विकास करू अन प्रत्येक समस्येला वाचा फोडू, अशी ग्वाही ही द्यायला शंकर जगताप विसरले नाहीत. 


 शंकर जगताप नेमकं काय म्हणाले?


'लक्ष्मण जगतापांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेची पोटनिवडणुक बिनविरोध व्हायला हवी होती. पण तसं घडलं नाही. या दरम्यान काही असंतुष्ट लोकांनी जगताप कुटुंब फोडण्यास सुरुवात केली. भाऊ जाऊन जेमतेम पंधरा दिवस झाल्यानंतर असं संकट आमच्यावर ओढावल्यानं तेव्हा आम्हाला खूप वाईट वाटलं. त्याहून अधिक दुःख म्हणजे परकीयांसह स्वकीयांनी ही हल्ला केला. घरातल्यांनीच हा हल्ला केल्यानं जगताप कुटुंबियांच्या स्मरणात तो कायम राहणार आहे. अशी वेळ दुश्मनांच्या कुटुंबावर कधीच येऊ नये. मात्र असो, आपण कोणाची राजकीय इच्छा दाबून ठेऊ शकत नाही. पण ही इच्छा कधी प्रकट करायला हवी, हे प्रत्येकाला ज्ञात असायला हवं, तेवढी राजकीय इच्छाशक्ती प्रत्येकात असायला हवी. परंतु त्याच विघ्नसंतुष्ठ व्यक्तींनी जगताप कुटुंबीय फोडण्याचं काम केलं. त्या सर्वांचे मी आजच्या या आभार मेळाव्यात 'आभार' मानतो. कारण त्यांनी कुटुंब फोडण्यासाठी जितके प्रयत्न केले, आम्ही तितकेच एक होत गेलो. आत्तापर्यंत भाऊ एकटेच कार्य करत होते. आता मात्र मी आणि वहिनी असे दोघे मिळून जनता आणि कार्यकर्त्यांसाठी कटिबद्ध असू. भाऊंचे अपूर्ण स्वप्न आम्ही दोघे मिळून सत्यात उतरवू अशी ग्वाही देतो, असं शेवटी शंकर जगतापांनी आवर्जून नमूद केलं.