पुणे : पिझ्झा हा पदार्थ इटालियन असला, तरी भारतातही अनेकांच्या जीभेवर पिझ्झाची चव रेंगाळते. गरमागरम पिझ्झाचा सुगंध दरवळायला लागला की, आपसूकच भूक चाळवते. पुण्यात जगातील सर्वात छोट्या आकाराचा पिझ्झा तयार केल्याचा दावा करण्यात येत आहे.


पुण्याचा शेफ संतोषने पिझ्झा बनवण्याचा एक अनोखा प्रयोग केला आहे. एक रुपयाच्या नाण्याइतक्या आकाराचा पिझ्झा बनवण्यात आला आहे.

नाण्याइतक्या आकाराच्या पिझ्झाचा समावेश काही दिवसांनी मेन्यू कार्डमध्ये करण्यात येणार आहे. त्याचं नाव बटन पिझ्झा असं ठेवण्यात आलं आहे. केवळ एक रुपयात एका पिझ्झाचा आस्वाद ग्राहकांना घेता येईल.

हा जगातला सर्वात छोट्या आकाराचा पिझ्झा असल्याचा दावा त्याने केला असून, लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद होण्यासाठी प्रवेशिकाही पाठवली आहे. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी शेफ संतोषच्या होऊ घातलेल्या विक्रमाचे निरीक्षक म्हणून काम पाहिलं.

पुण्यातील 'ऑस्टिन कॅफेहाऊस 40' मध्ये शेफ संतोषने या आकाराचे तब्बल 4 हजार पिझ्झा बनवले आणि लहान मुलांना दिले. पुण्यातील 'खाऊची बाराखडी' या ग्रुपने संतोषला पिझ्झा बनवण्यात मदत केली.