पुणे: दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मेणाच्या पुतळ्याचं लोकापर्ण करण्यात आलं आहे. लोणावळ्यातील सेलिब्रेटी वॅक्स म्युझियममध्ये हा पुतळा साकारण्यात आला आहे.

बाळासाहेबांचा हुबेहूब मेणाचा पुतळा वॅक्स कलावंत सुनील कंडलूर यांनी साकारुन, त्याचं युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं.



बाळासाहेबांच्या फोटोचा अभ्यास करुन कंडलूर यांनी मेणाचा पुतळा साकारला.

सिंहासन, बसण्याची पद्धत, हावभाव आणि गॉगल पाहिल्यानंतर अगदी बाळासाहेबच समोर बसल्याची प्रचिती येते.



मेणाचा हा पुतळा तीन वर्षांपूर्वी, तीन महिने कसरत घेऊन उभारण्यात आला होता. ठाकरे कुटुंबीयांची परवानगी मिळत नसल्यानं तो खुला करण्यात आला नव्हता. मात्र रविवारी आदित्य ठाकरे लोणावळ्यात एका कार्यक्रमानिमित्त आले असता, त्यांना बाळासाहेबांचे दर्शन घडवण्यात आले आणि त्यांच्या हस्तेच अनावरण केले गेले.



या म्युझियममध्ये देश पातळीवरील विविध राजकीय व्यक्ती, खेळाडू, बॉलिवूड, हॉलिवूडचे कलाकार, महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रमुख व्यक्ती असे सुमारे 90 मेणाचे पुतळे आहेत.

लवकरच संग्राहलयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रिपाईचे नेते रामदास आठवले, वनमंत्री सुधीर मुंनगटीवार यांचे पुतळे दाखल होणार आहेत.