Pune Crime News: गुंतवणुकीचे आमिष दाखवून मूकबधिरांची फसवणूक करणाऱ्या मूकबधिर आरोपींविरुद्ध पुणे शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 6 आरोपींना अटक करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणातील आरोपींकडून एक कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली असून ती न्यायालयात जमा करण्यात आली आहे.
अमिर सैफुद्दीन घोडनडीवाला, प्रदीप महारुद्र कोलते, सुयोग सुधीर मेहता, चंचल सुयोग मेहता , धनंजय सुदामराव जगताप, मिहिर संतोष गोखले ( अशी या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेले सहा आरोपी मूकबधिर आहेत. आरोपी सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.
या सहा आरोपींनी प्लॅटिनम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स ग्लोबल सोल्युशन्स आणि सुयो अभि एंटरप्रायझेस नावाच्या कंपन्या स्थापन केल्या होत्या. मूकबधिर लोकांना या कंपनीत गुंतवणूक केल्यास दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवले जात होते. फसवणूक उघडकीस आल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई करत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
आरोपी, साक्षीदार आणि तक्रारकर्ते तिघेही मूकबधिर आहेत. पोलिसांना त्यांच्याशी संवाद साधण्यात अडचण येत होती मात्र तरीही पोलिसांनी कसून चौकशी केली. 467 मूकबधिर साक्षीदारांशी संपर्क साधण्यात आला होता. आरोपींविरुद्ध सगळे पुरावे गोळा पोलिसांकडून करण्यात आले. यापैकी 60 लोकांकडून मिळालेल्या रक्कम जप्त करण्यात आली आहे. डी डी मार्फत ही रक्कम परत मिळवली होती. एक कोटी रुपयांची रक्कम न्यायालयात जमा करण्यात आली आहे.
या प्रकरणातील आरोपींनी गुंतवणूकदारांना परतावा दिला आहे. ज्यांना परतावा म्हणून जास्त रक्कम मिळाली आहे त्यांनी ती रक्कम डीडीद्वारे जिल्हा न्यायाधीशांकडे जमा करावी. यामुळे इतरांना मदत करणे शक्य होईल, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. यानंतर अशा कोणत्याच आमिषांना बळी पडू नका, पैशांचा व्यवहार करताना काळजी घ्या. योग्य पडताळणी करा, असं आवाहन पुणे पोलीसांना सामान्य नागरिकांना केले आहे.