Pune Potholes News: गेल्या आठवड्याभरात पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे तर काही ठिकाणी रस्ते खचले असल्याचे दिसून येत आहे. त्यासंदर्भात पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील पत्र लिहिले असून तातडीने रस्ते दुरुस्त करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.


गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे कोथरुड मतदार संघातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यात प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज चौक, भेलकेनगर चौक, राहुलनगर, नवीन शिवणे, कर्वेरोड, आशिष गार्डन चौक, गुजराथ कॉलनी परिसर, नळस्टॉप चौक (एसएनडीटी चौक- कॅनॉल रोड), पौड फाटा, सदानंद हॉटेलसमोरील बाजू, चांदनी चौक आयटी पार्क समोर, कोथरुड डेपो, मातोश्री वृद्धाश्रमजवळील रस्ता, पौड रोड आनंदनगरसमोरील बाजू, यांसह विविध भागांतील रस्ते मोठ्या प्रमाणात खचले आहेत. याशिवाय काही ठिकाणी सिमेंट रस्त्या लागतचे डांबरी रस्ते खचून असमान झाले आहेत.


त्यामुळे सदर रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे. अन्यथा सदर रस्त्यांवर एखादा मोठा अपघात होऊन, जीवितहानी होण्याची शक्यता आहे. तरी संभाव्य शक्यताची भीषणता लक्षात घेऊन सदर भागातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्राद्वारे केली आहे.


पुण्यातील खड्ड्यांविरोधात पुणे शहरात प्रत्येक पक्षांकडून रोज मोठी आंदोलनं सुरु आहेत. राष्ट्रवादी पक्षाने तर खड्ड्यात मासे सोडत आंदोलन केलं होतं. तर मनसेने खड्ड्यांची पुजा करुन रांगोळी घालून आंदोलन केलं. गेले पाच वर्ष पुण्यात भाजपची सत्ता होती. त्यामुळे खड्ड्यांबाबतचं सगळं खापर भाजपवर फोडलं जात आहे. त्यात 90 टक्के खड्डे बुजवल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला होता. मात्र हा दावा खोटा असल्याचं पुणे शहरातील राष्ट्रवादीच्या नेत्यांचं म्हणणं आहे. चंद्रकांत पाटील यांच्या पत्रामुळे खड्डेमुक्त पुणे होणार का?, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.