Pune Porsche Car Accident : एका धनिकाच्या दारुड्या पोरानं दारूच्या नशेत गाडी चालवली आणि दोघांचे बळी घेतल्याची घटना घडली. आता या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त होतोय. सोशल मिडीयावर पोलिसांवर यथेच्छ टीका होताना दिसत आहे. या प्रकरणात मुलाचा ब्लड रिपोर्ट सध्या मोठ्या कुतूहलाचा विषय आहे.


पुण्यातल्या या भीषण आणि बेदरकार दुर्घटनेला चार दिवस झाले आहेत. शनिवारच्या रात्री अडीच वाजता अगरवाल कुटुंबातल्या एका दिवट्यानं दोन अभियंत्यांना आपल्या गाडीनं उडवलं. त्यामध्ये दोन्ही अभियंते मरण पावले. अपघातानंतर लोकांनी दिवट्या अगरवालला चोप दिला आणि पोलिसांकडं सोपवलं.


अगरवालांचा दिवट्या शनिवारी रात्री 9 ते 10 च्या सुमारास दारु प्यायला बसला होता. रात्री अडीच वाजता त्यानं अपघात केला. त्याचे ब्लड सँपल दुसऱ्या दिवशी दीड वाजता म्हणजे 14 तासांनंतर घेतले गेले.


रक्तामध्ये 12 तास तर लघवीमध्ये 24 तास दारूचा अंश


दारु प्यायल्यानंतर आपल्या शरीराच्या विविध अंगांमध्ये दारुचा अंश किती काळ राहतो यावर एक नजर टाकू या. अमेरिकेच्या अॅडिक्शन सेंटरच्या माहितीनुसार, दारु प्यायल्यानंतर रक्तामध्ये 12 तासांपर्यंत दारूचा अंश असतो. श्वासांमधून तो जवळपास 24 तासांपर्यंत राहतो. लघवीमध्येही दारूचा अंश  24 तासांपर्यंत राहतो. दारु जास्त ढोसली तर लघवीत दारूचा अंश  72 तासांपर्यंत राहतो. लाळेमध्येही 12 तासांपर्यंत दारूचा अंश टिकून राहतो. केसांमध्ये मात्र एकदा दारु प्यायला की 90 दिवसांपर्यंत दारूचा अंश राहतो असं अमेरिकेचं अॅडिक्शन सेंटर सांगतंय.


कुठल्याही गुन्ह्यात पोलीस आरोपींना सरकारी रुग्णालयातच टेस्टसाठी नेतात. पण टेस्टसाठीच्या सरकारी लॅब हाताच्या बोटाइतक्या मर्यादित असल्यानं रिपोर्ट यायला वेळ लागतो. इतरही काही गोष्टींमुळे ब्लड रिपोर्ट यायला उशीर होतो.


पोलिसांच्या भूमिकेवर संशय


पुण्यातल्या दुर्घटनेत ब्लड रिपोर्ट खूप महत्वाचा आहे. तो पॉझिटिव्ह असेल तरच अगरवालच्या दिवट्याविरुद्ध खटला मजबूत होणार आहे. अगरवालचा दिवट्या आपल्या मित्रांसोबत पार्टी करतोय त्याचं सीसीटीव्ही पोलिसांना मिळालंय. पण पोलिसांनी त्याच्या मित्रांची कोणतीही टेस्ट केलेली नाही किंवा त्यांना साधं चौकशीलाही बोलावलं नाही. त्यामुळे आता पोलिसांच्याच भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. 


दरम्यान, आरोपी अल्पवयीन मुलाला मिळालेला जामीन बाल न्याय मंडळाने रद्द केला असून आरोपीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. 


ही बातमी वाचा: