Pune bypoll election : पुणे पोटनिवडणुकीत मोठ्या प्रमाणात घडामोडी घडताना दिसत आहे. एकमेकांवर पैसे वाटल्याचा काल दिवसभर आरोप करण्यात आला मात्र रात्री उशीरा पुण्यातील गंज पेठेत पैसे वाटण्यावरुन मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. कसबा संघातील गंज पेठेत मोठा गोंधळ उडाला. पैसे न घेतल्याने एका महिलेला मारहाण करण्यात आल्याचं समोर आलं. रात्री उशीरा या सगळ्या प्रकारामुळे गंज पेठेत मोठा गोंधळ झाला. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
गंजपेठ परिसरातील भाजपचे माजी नगरसेवक विष्णू अप्पा हरिहर यांचा भाऊ हिरा हरिहर यांनी पैसे न घेतल्याने एका महिलेला मारहाण केली. कालपासून सगळीकडे कार्यकर्ते पैसे वाटत होते. हरिहर यांना डावलल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी राग व्यक्त केला. त्यांनी गंज पेठेत येऊन नागरिकांना शिवीगाळ आणि मारहाण केली. यासंदर्भात कॉंग्रेसचे माजी आमदार रमेश बागवे यांनी आरोप केले. यासंदर्भात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.
नागरिक संतापले...
नागरिकांना मारहाण केल्यामुळे अनेक नागरिक मध्यरात्री रस्त्यावर उतरले होते. त्यांनी गोंधळ निर्माण केला. किमात 50 ते 60 नागरिक मध्यरात्री नागरिक रस्त्यावर उतरलेले दिसले. त्यांनी अनेकांवर आरोप केला. पोलीस कारवाई करत नाही आहे. पोलीस दबावाखाली काम करत आहे, असे आरोप अनेकांनी केले आहे. यावेळी पोलीसही नागरिकांशी उपजत घालताना दिसले. याचे व्हिडीओदेखील व्हायरल झाले आहे. रात्री हा प्रकार समजल्याने नागरिक संतापले. त्यांनी थेट पोलिस ठाणे गाठत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते.
भाजपने पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटले, रविंद्र धंगेकरांचा आरोप
भाजपने पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटल्याचा आरोप कसबा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी केला. याला विरोध म्हणून धंगेकरांनी कसबा गणपती मंदिरासमोर उपोषण केलं होतं. मात्र पोलिसांनी त्यांना कारवाईच आश्वासन दिलं, त्यामुळे त्यांनी उपोषण सोडलं. कसबा पोटनिवडणुकीच्या मतदानाला काहीच दिवस बाकी असताना पुण्यात पैसे वाटतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. विशेष म्हणजे हे सगळं पोलिसांसमोर घडत आहे. या सगळ्या प्रकारावर पोलीस दुर्लक्ष करत आहे. त्यामुळं लोकशाहीची हत्या होऊ नये यासाठी हे आंदोलन केलं होतं असं धंगेकरांनी सांगितलं.