पुणे :  पुणे लोकसभेची पोटनिवडणूक (Pune Bypoll Election)  लढवण्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरु आहे. पुण्यात राष्ट्रवादीचे 40 तर काँग्रेसचे फक्त 10 नगरसेवक असल्याचा दावा अजित पवारांनी केला आहे. मात्र पुण्यात राष्ट्रवादीचे 40 नाही तर केवळ 13 नगरसेवक असल्याचं काँग्रेसने दाखवून दिले आहे. राष्ट्रवादीचे बहुतांश नगरसेवक पुणे लोकसभा मतदारसंघाचा भाग नसलेल्या हडपसर आणि वडगाव शेरी मतदारसंघातील असल्याचं काँग्रेसने दाखवून दिले आहे. यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीत जागावाटपावरुन ताण वाढण्याची शक्यता आहे. 


कॉंग्रेसच्या मतांची आकडेवारी राष्ट्रवादीच्या मतांपेक्षा जास्त


कॉंग्रेसच्या दाव्यानुसार पुणे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघातील मतांची बेरीज केल्यास कॉंग्रेसच्या मतांची आकडेवारी राष्ट्रवादीच्या मतांपेक्षा जास्त आहे . त्यामुळे पुण्याची जागा आपणच कायम ठेवणार असल्याच कॉंग्रेसने म्हटले आहे. पुणे लोकसभेमध्ये सहा विधानसभा मतदारसंघ यापैकी दोन विधानसभा मतदारसंघ हे राष्ट्रवादीकडे त्यापैकी वडगाव शेरी येथे सुनील टिंगरे हे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आहे त्यांना 97, 708 मते मिळाली तर पर्वती विधानसभा मतदारसंघात अश्विनी कदम यांना दुसऱ्या क्रमांकाची 60, 225 मते मिळाली होती अशी एकूण 1, 57,953 मते राष्ट्रवादीला मिळाली होती.


तर काँग्रेस पक्षाच्या वाटेला तीन विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी कसबा पेठ पोटनिवडणुकीत काँग्रेसचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांना 73,309 मते तर  शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे दत्ता बहिरट यांना दुसऱ्या क्रमांकाची 53, 603  आणि पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघात काँग्रेसचे रमेश बागवे यांना दुसऱ्या क्रमांकाची 47, 148 मते प्राप्त झाली होती एकूणच काँग्रेस पक्षाला एक लाख 74 हजार 60 मते मिळाली होती ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुलनेत जास्त आहे.


राष्ट्रवादीचे  29 नगरसेवक हडपसर व खडकवासला मतदारसंघातील


पुणे शहरात  राष्ट्रवादी काँग्रेसच्या 42 नगरसेवकांपैकी फक्त 13 नगरसेवक हे लोकसभा हद्दीत येतात. तर उर्वरित 29 नगरसेवक हडपसर व खडकवासला मतदारसंघातील प्रभागातून निवडून आले आहेत. काँग्रेसचे दहा नगरसेवक हे लोकसभा हद्दीत निवडून आलेले आहेत. तर कोथरूड मतदारसंघात मनसेचा उमेदवार देण्यात आला होता. पुणे लोकसभेसाठी तयारी पुणे निवडणूक विभागाकडून पूर्ण झाली आहे. या निवडणुकीसाठी लागणारे मतदान यंत्र म्हणजेच EVM देखील पुण्यात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात निवडणूक जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. अशावेळी भाजपचे दिवंगत खासदार यांची जागा कोण भरुन काढणार?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यात भाजप आणि कॉंग्रेसकडून निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी सुरु झाली आहे. 


अनेक वर्षांपासून पुणे लोकसभेची जागा कॉंग्रेसकडे


असं असलं तरीही मागील अनेक वर्षांपासून पुणे लोकसभेची जागा कॉंग्रेसकडे आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून ही जागा कॉंग्रेसलाच दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे. महाविकास आघाडीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या दाव्याने नव्याने चर्चा सुरु झाली आहे. विधानसभेच्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसनं भाजपविरोधात 40 वर्षांनी विजय खेचून आणला त्यामुळे आता ही जागा महाविकास आघाडीकडून कोणाला दिली जाते, हे पाहणं महत्वाचं आहे. त्यात कॉंग्रेसकडून तीन नावांची चर्चा आहे. अरविंद शिंदे, मोहन जोशी आणि रविंद्र धंगेकर यांच्या नावाचा समावेश आहे.