Pune Bypoll election : चिंचवड विधानसभेत वंचितचा (pune bypoll election) पाठिंबा मिळविण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. बंडखोर राहुल कलाटे यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांनी ही वंचितला तसा प्रस्ताव पाठवला आहे. वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांच्याकडे पत्राद्वारे या दोघांनी ही पाठिंब्याची मागणी केलेली आहे. सध्या वंचितने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आघाडी केलेली आहे. परंतु 2019च्या विधानसभेत बंडखोर राहुल कलाटेंना वंचितने पाठिंबा दर्शवला होता. त्यामुळे आता या पोटनिवडणुकीत प्रकाश आंबेडकर कोणाच्या बाजूने उभे राहतात हे पाहणं महत्वाचं राहणार आहे.


चिंचवड विधानसभा मतदार संघात तिहेरी लढत होणार आहे. भाजपकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप, महाविकास आघाडीकडून नाना काटे आणि शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांच्यात  लढत होणार आहे. तिन्ही उमेदवार दणक्यात प्रचाराला लागले आहे. त्यामुळे तिघांमध्येही तगडी लढत होण्याची शक्यता आहे. त्यातच अनेक घटक पक्षांच्या पाठिंब्याची मागणी महाविकास आघाडी आणि बंडखोर उमेदवारांकडून केली जात आहे. त्यात वंचित बहुजन आघाडी यांच्या पाठिंब्यासाठी दोन्ही उमेदवारांकडून रस्सीखेच सुरु आहे.


नाना काटेच्या प्रचारासाठी बडे नेते


चिंचवडमध्ये महाविकास आघाडीकडून नाना काटे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचाराचा नारळ जयंत पाटील यांनी फोडला आणि धुमधडाक्यात प्रचाराला सुरुवात केली. त्यासोबतच महाविकास आघाडीचे कार्यकर्तेदेखील मोठ्या संख्येने उपस्थित राहत सभा आणि पदयात्रा पार पाडताना दिसत आहे. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सगळ्या कार्यकर्त्यांकडून जोरात प्रचार सुरु आहे. त्यांच्या सोबतच राज्यातील महाविकास आघाडीचे मोठे नेतेदेखील सभा आणि रोड शो करताना दिसत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनीदेखील नाना काटेंच्या प्रचारासाठी चिंचवडमध्ये हजेरी लावली होती. आता महाविकास आघाडीचे उमेदवार वंचितचा पाठिंबा मागत आहे.


राहुल कलाटेंमुळे निवडणूक चुरशीची



महाविकास आघाडीने उमेदवारी न दिल्याने राहुल कलाटे यांनी बंडखोरीचा निर्णय घेतला. अनेक नेत्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी विनंती केल्यानंतरही राहुल कलाटे निवडणूक लढवण्यावर ठाम होते. ते चिंचवडमध्ये आता शिट्टी या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे. 2019 च्या निवडणुकीत राहुल कलाटे यांना नाना काटे यांच्यापेक्षा जास्त मतं पडले होते. त्यामुळे महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलं आहे. वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मिळाला तर अधिक मतं पारड्यात मिळवता येईल, असा विचार महाविकास आघाडीकडून सुरू आहे.