Indapur fake Bomb :  इंदापूर (Indapur)  तालुक्यातील टणू गावात बॉम्बसदृश्य सापडलेल्या वस्तूचा स्फोट करून नाश केला आहे. काल दत्तात्रय मोहिते यांच्या गोठ्यात बॉम्ब सदृश वस्तू सापडली होती. त्यानंतर परिसरात भीतीच वातावरण निर्माण झालं होतं. मोहिते यांनी तात्काळ इंदापूर पोलिसांना कल्पना दिली. त्यानंतर तात्काळ इंदापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. इंदापूर पोलिसांनी पुणे ग्रामीणचे बीडीडीएस पथकशी संपर्क करून पथकाला बोलवून घेतलं. 


नेमकं काय घडलं होतं?


काल (13 फेब्रुवारी) संध्याकाळी पथक टनू गावात दाखल झाले होते. त्यानंतर आज सकाळी संपूर्ण तपास करून पुणे शहर बीडीडीएसच्या पथकाच्या मदतीने त्या संशयास्पद वस्तूचा नाश करून विघटन केलं आहे. जरी या वस्तूचा नाश केला असला तरी अनेक प्रश्नांची उत्तरे अनुत्तरीत राहत असल्याची चर्चा आहे. संबंधित वस्तू या ठिकाणी कशी आली? हा नेमका बॉम्ब होता की आणखी काही? यात दारू होती का? यात कोणते पदार्थ होते याचा तपास इंदापूर पोलीस करत आहेत. इंदापूर तालुक्यात 121 टीएमसी क्षमतेचे उजनी धरण आहे अशा ठिकाणी अशा गोष्ट सापडणं ही खरंच चिंतेची बाब आहे. पोलीस या सर्व शक्यता लक्षात घेऊन तपास करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांच्या तपासात काय निष्पन्न होत हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.


शेतात सापडलेली वस्तू संशयास्पद असल्याने बीडीडीएस टीम शेतात दाखल झाली. या पथकाने वस्तुची पाहणी  केली त्यात  स्फोटकं असल्याचं समोर आलं होतं. ग्रामीण बीडीडीएसच्या टीमच्या मदतीला पुण्याची बीडीडीएसची टीम आली. त्यांनीदेखील संशयास्पद वस्तुची पाहणी केली. त्यांनंतर स्फोटकांना मोकळ्या जागेवर नेऊन स्फोट घडवून आणला. या स्फोटात सापडलेले केमिकल आहेत ते आम्ही ताब्यात घेतले आहेत. ते केमिकल तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली आहे. 


घटनेनं सर्वत्र खळबळ, पोलीसांचा बंदोबस्त तैनात


शेतात बॉम्बसदृश्य वस्तु सापडल्याच्या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. शेतात बॉम्बसदृश्य वस्तु सापडल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. गावकऱ्यांनी गर्दी करु नये, यासाठी शेताच्या चहू बाजूस  पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बीडीडीएस टीमने संपूर्ण चौकशी केली. त्यांनी पाहणी केली. त्यानंतर इंदापूर तालुक्यातील टणू गावात बॉम्बसदृश्य सापडलेल्या वस्तूचा स्फोट करून नाश केला आहे.