Pune Bypoll Election :  पुण्यातील कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक (Chinchwad By-Election) जाहीर झाल्यापासून उमेदवारी कोणाला मिळणार?, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. त्यात काल (29 फेब्रुवारी) दिल्लीवरून थेट पुण्यात आलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  (Devendra fadanvis) अचानकपणे दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या घरी पोहचले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. दिवंगत लक्ष्मण जगतापांच्या पत्नी अश्विनी जगताप किंवा लहान बंधू शंकर जगताप (shankar jagtap) पैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल अशी शक्यता होती. मात्र या भेटीदरम्यान निवडणुकीसंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही, असा दावा लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनी केला आहे. 


शंकर जगताप म्हणाले, लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर शोक सभा झाली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांना घरी यायचं होतं. कुटुंबियांची भेट घ्यायची होती. त्यांनी त्यासंदर्भात माहितीदेखील दिली होती. त्यानुसार त्यांनी आमची भेट घेतली. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. पोटनिवडणुकी संदर्भातदेखील कोणतीही चर्चा झाली नाही. त्यांनी लक्ष्मण जगताप यांच्याबरोबरच्या आठवणी सांगितल्या. लक्ष्मण जगताप यांच्या कामाचं कौतुक केलं. त्यांनी एखादं काम हाती घेतलं ही पूर्ण करायचे, असं म्हणत देवेंद्र फडवीसांनी जगताप यांंच्या कामाची पद्धत सांगितली. त्यामुळे बंद दारामागे काहीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं शंकर जगताप यांनी स्पष्ट केलं. 


कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक भाजपला बिनविरोध करायची आहे. मात्र अश्विनी जगतापांना उमेदवारी दिली तरच ते शक्य होणार आहे. मात्र शंकर जगतापांना तिकीट दिल्यास विरोधकांनी निवडणूक  लढविण्यासाठी मोर्चेबांधणी केलेली आहे. त्यामुळे अश्विनी जगतापांना उमेदवारी देण्यासंदर्भात आणि शंकर जगतापांची समजूत काढण्यासाठी फडणवीस आले होते. अशीच चर्चा रंगलेली आहे. अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिल्यानंतर जगताप कुटुंबीयात कोणताही वाद होऊ नये म्हणून फडवीसांनी ही खबरदारी घेतल्याचं बोललं जातं आहे. पण अर्धा तासांच्या बैठकीनंतर फडणवीस माध्यमांशी न बोलताच पुढं मार्गस्थ झाले होते. त्यानंतर शंकर जगताप यांनी ही भेट राजकीय नव्हती, यात उमेदवारी बाबत कोणतीही चर्चा झाली नाही. असा दावा केला आहे.



दोन्ही मतदार संघात ईच्छूकांची मोठी यादी


दोन्ही मतदार संघात सगळ्या पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. सगळ्या पक्षाच्या उमेदवारीसाठी ईच्छूकांची यादी मोठी आहे. कसबा मतदार संघ भाजपचा पारंपारिक मतदार संघ मानला जातो. त्यामुळे या मतदार संघाच्या उमेदवाराकडे सगळ्यांचं लक्ष आहे. दोन्ही मतदार संघात भाजपच्या  ईच्छूक उमेदवारांची मोठी यादी आहे. त्यामुळे आता दोन्ही मतदार संघात नेमकी उमेदवारी कोणाला मिळते, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.