Pune Bypoll election : मतदानासाठी काहीच तास बाकी राहिले (Pune Bypoll Election) आहेत मात्र भाजप आणि महाविकास आघाडीत अजूनही आरोप-प्रत्यारोपाचं सत्र सुरुच आहे. कॉंग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी आचासंहिता भंग केली असून त्यांची उमेदवारी रद्द करावी, या मागणीसाठी भाजपच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. त्यावर रविंद्र धंगेकरांनी चांगलाच हल्लाबोल केला आहे. निवडणूक आयोगाला नोटीस पाठवायची असेल तर आधी भाजपला नोटीस द्या आणि मगच मला नोटीस द्या, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 


काल संध्याकाळी पाच वाजता पुणे पोटनिवडणुकीचा प्रचार संपला. शेवटच्या दिवशीही दोन्ही पक्षाने प्रचार जोरात केला. भाजपचे हेमंत रासने यांचा प्रचार करण्यासाठी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रोड शो केला. यावेळी अनेकांनी गर्दी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी धडाकेबाज भाषण केलं. यावर धंगेकरांनी आरोप केला आहे. मुख्यमंत्र्यांचं भाषण संध्याकाळी पाच नंतरही सुरुच होतं. त्यावेळी आचारसंहितेचा भंग झाला नाही आणि पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटप केल्यामुळे उपोषण केल्याने लगेच आचारसंहितेचा भंग झाला, असं भाजपचं म्हणणं आहे. असं असेल तर आधी निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली तर मी त्यांना स्पष्ट सांगेन की आधी भाजपला नोटीस द्या आणि मग मला द्या, असा हल्लाबोल धंगेकरांनी केला आहे.


भाजपकडून धंगेकरांची तक्रार


भारतीय जनता पक्षाकडून कॉंग्रेसचे कसबा पेठचे उमेदवार रविंद्र धंगेकर  यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी, यासाठी भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. भाजपचं शिष्ठमंडळाने निवडणूक कार्यलयात जाऊन तक्रार केली आहे. रविंद्र धंगेकर यांनी कसबा गणपती समोर आंदोलन करुन आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल आणि धंगेकरांच्या सभेत धार्मिक धृवीकरण करण्याचा प्रयत्न झाल्याबद्दल ही तक्रार दाखल करण्यात येणार आहे. आचारसंहितेचा भंग करत आज रविंद्र धंगेकर उपोषणाला बसले होते असा आरोप भाजपने केला आहे.


धंगेकरांचं उपोषण


भाजपने  पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटप केले असा आरोप त्यांनी केला होता. त्यामुळे त्यांनी कसबा गणपती मंदिरासमोर उपोषण केलं होतं. मात्र पोलिसांनी त्यांना कारवाईच आश्वासन दिलं त्यामुळे त्यांनी उपोषण सोडलं असं त्यांनी सांगितलं आहे. कसबा पोटनिवडणुकीच्या मतदानाला काहीच दिवस बाकी असताना पुण्यात मागील पैशांचा पाऊस पडत आहे. हे सगळं पोलिसांसमोर घडत आहे. या सगळ्या प्रकारावर पोलीस दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे आज लोकशाहीची हत्या होऊ नये यासाठी हे आंदोलन केलं होतं. यापुढे असे प्रकार घडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी आम्हाला दिली. त्यामुळे उपोषण मागे घेत आहे, असं ते म्हणाले.