PCMC News : पुण्यात आणि पिंपरी-चिंचवड शहरात अनेक जुने वाडे आणि जुन्या इमारती आहेत. याच इमारती आता पडण्याच्या अवस्थेत दिसतात. दरवर्षी पावसाळ्यात जुन्या आणि धोकादायक इमारतींचा भाग कोसळून दुर्घटना घडतात. याच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने धोकादायक इमारतींकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. शहरातील तब्बल 125 इमारती धोकादायक अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. या धोकादायक इमारतीच्या मालकांना महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. विशेष म्हणजे तेथे राहणाऱ्या भाडेकरू नागरिकांनी दुरुस्तीबाबत नोटीस दिल्यानंतर पालिकेने दुरुस्तीची दखल घेतली आहे. महापालिकेच्या प्रभागस्तरीय कार्यालयांच्यावतीने महापालिकेच्या परिसरातील धोकादायक इमारतींबाबत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
पावसाळ्यात वादळ आणि पावसाचा जोर वाढल्यास अशा धोकादायक इमारतीचा काही भाग किंवा इमारतच कोसळू शकते. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला असलेला धोका आणि संभाव्य जीवितहानी दूर करण्यासाठी धोकादायक इमारतीची दुरुस्ती करावी. तसेच अशा इमारती हटविण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
एखादी इमारत किंवा तिचा भाग धोकादायक किंवा पडण्याच्या अवस्थेत असल्यास त्याची लेखी माहिती महापालिकेला द्यावी, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. अशा इमारतींची पाहणी करून धोका दूर करण्यासाठी उपाययोजना केल्या जातील किंवा एखादी इमारत किंवा इमारतीचा काही भाग चुकून कोसळल्यास अपघाताची माहिती महापालिकेला दूरध्वनी क्रमांक 27425511 आणि 67333333 वर कळवावी, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
महापालिकाअधिनियम कलम 265 अन्वये इमारतीच्या सुरक्षेची जबाबदारी इमारतीच्या मालकाची आहे. इमारत सुस्थितीत आहे की नाही, इमारतीला काही धोका आहे का? तज्ज्ञ अभियंत्यांकडून त्याची तपासणी करून वेळीच आवश्यक उपाययोजना करणे आवश्यक आहे. तसे न केल्यास व कोणतीही दुर्घटना घडल्यास इमारत मालकास जबाबदार धरून महापालिकेच्या वतीने कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
जुन्या इमारतींची पाहणी केली जाईल तेव्हा पावसाळ्यात धोकादायक इमारतीत राहण्याऐवजी नागरिकांनी इतरत्र राहण्याची व्यवस्था केली तर बरे होईल. अशा इमारतींच्या दुरुस्तीसाठी मालक किंवा भाडेकरू यांच्याकडून येणाऱ्या अर्जाचा प्राधान्याने विचार केला जाईल, असे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. पावसाळा सुरू झाला की जुन्या इमारती धोकादायक बनतात आणि अशा इमारतींमध्ये आणि इमारतीच्या आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होतो. ते टाळण्यासाठी महापालिकेच्या वतीने जुन्या इमारतींची तपासणी करण्यात येणार आहे.