Pune Bypoll Election : पुण्यातील कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली आहे. या दोन्ही मतदारसंघात भाजप (Bjp) विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होत आहे. दरम्यान, या दोन पोटनिवडणुकांच्या प्रचाराची खरी रणधुमाळी आजपासून सुरु होणार आहे. कारण आज सर्वपक्षीय मोठे नेते या प्रचारात उतरणार आहेत. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे देखील आज पुण्यात प्रचारासाठी येणार आहेत.


तांबडी जोगेश्वरीला नमस्कार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ होणार


कॉंग्रेसचे कसबा पेठ मतदारसंघातील उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज करण्यात येणार आहे. त्यांच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे हे आज उपस्थितीत होणार आहेत. तसेच कॉंग्रेसचे आमदार संग्राम थोपटे, राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे यावेळी हजर राहणार आहेत. पुण्याची ग्रमादेवता असलेल्या तांबडी जोगेश्वरीला नमस्कार करुन साडेनऊ वाजता धंगेकरांच्या प्रचाराची सुरुवात होणार आहे. 


कसब्याच चंद्रकांत पाटील तर चिंचवडमध्ये अजित पवार 


भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचाराची सुरुवात मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पुण्यातील ओंकारेश्वराची आरती करुन साडेनऊ वाजता होणार आहे. तसेच चिंचवडचे राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रसारासाठी काढण्यात येणाऱ्या पदयात्रेत विरोधी पक्षनेते अजित पवार दुपारी एक वाजता सहभागी होणार आहेत. पोटविनवडणुकीच्या निमित्तानं भाजप आणि महाविकास आघाडीनं जोरदार ताकद पणाला लावली आहे. 


26 फेब्रुवारीला दोन्ही जागांसाठी मतदान 


आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. येत्या 26 फेब्रुवारीला या दोन्ही जागांसाठी मतदान पार पडणार आहे. भाजप आणि महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक महत्वाची मानली जात आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपकडून चिंचवडमधून अश्विनी जगताप या दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी निवडणूक लढवत आहेत. त्या प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आहेत. या प्रतिष्ठानद्वारे महिला बचत गटांचं जाळं पसरवलं आहे. महिलांच्या विकासासाठी त्यांनी मोठं काम केलं आहे. लक्ष्मण जगताप निवडणुकीस उभे असताना त्या प्रचारात सक्रिय असायच्या. मात्र निवडणूक त्या पहिल्यांदाच लढवत आहेत. तर कसब्यातून भाजपकडून हेमंत रासने निवडणूक लढवत आहेत. दुसरीकडे चिंचवडमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे निवडणूक लढवत आहेत. तर अपक्ष म्हणून राहुल कलाटे निवडणूक लढवत आहेत.


महत्त्वाच्या बातम्या:


Pune Bypoll election : पुण्यातील पोटनिवडणुकांसाठी भाजपचे उमेदवार ठरले; कसब्यातून हेमंत रासने, तर चिंचवडमधून अश्विनी जगताप यांना उमेदवारी