पिंपरी - चिंचवड: पुण्याची कसबा विधानसभा पोटनिवडणूक (Kasaba Bypoll Election 2023) आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणूक (chinchwad Bypoll Election 2023) राजकारणाच्या केंद्रस्थानी आली आहे. या दोन्ही जागांसाठी महाविकासआघाडीमध्ये रस्सीखेच सुरु आहे तर दुसरीकडे ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने अद्याप उमेदवारी जाहीर केलेली नाही. असं असताना महाविकासआघाडीतील पक्षांकडून या जागेसाठी दावा केला जात आहे. एखाद्याच्या निधनानंतर होणारी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची प्रथा पाळण्याऐवजी इथं तर महाविकासआघाडीमध्ये अंतर्गत आखाडा रंगला आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत चिंचवड विधानसभा हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आहे. पण आता महाविकासआघाडीत या जागेवर थेट उद्धव ठाकरे शिवसेनेनं दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंशी याबाबत चर्चा केली होती. पण सकाळ उजडताच संजय राऊतांनी धक्कातंत्र अवलंबत थेट चिंचवड विधानसभेवर डोळा टाकलाय. संजय राऊतांनी त्या जागेसाठी दावा का करतायत असा प्रश्न पडतो. मात्र 2019 च्या चिंचवड विधानसभेचा निकाल पाहिल्यानंतर हे लक्षात येते.
विधानसभेवेळी भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या विरोधात शिवसेनेचे बंडखोर राहुल कलाटे यांनी निवडणूक लढवली होती. यात कलाटे यांचा अवघ्या 38 हजारांनी पराभव झाला अन् पुन्हा ते स्वगृही परतले. तेच राहुल कलाटे या पोटनिवडणुकीसाठी तीव्र इच्छुक आहेत, म्हणूनच खासदार संजय राऊतांनी चिंचवड विधानसभेवर दावा ठोकला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने राहुल कलाटे यांनी इतकं मताधिक्य मिळवलं होतं. त्यामुळंच राष्ट्रवादी काँग्रेस इतक्या सहजतेने चिंचवडची जागा सोडणार नाही हे उघड आहे. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसने सावध भूमिका घेत महाविकासआघाडीच्या बैठकीतच हा निर्णय होईल असं स्पष्ट केलंय.
जगताप कुटुंबियांना उमेदवारी मिळण्याची शक्यता
चिंचवड विधानसभा मतदारसंघातून जगताप यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीला सुरुवात होताच दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे संपर्क कार्यालय पिंपळे गुरव येथे गर्दी झाली होती. त्यासोबतच लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनादेखील उमेदवारी मिळण्याची मोठी शक्यता आहे.
भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या रिक्त जागेवर ही पोटनिवडणूक होत आहे. अद्याप भाजपने उमेदवारी जाहीर ही केलेली नाही. आत्तापर्यंत अशा पोटनिवडणुका बिनविरोध करण्याची प्रथा यावेळी पाळली जाईल अशी अपेक्षा असताना इथं महाविकासआघाडीने मात्र उमेदवारीसाठी अंतर्गत आखाडा रंगवलाय, जे महाराष्ट्राच्या संस्कृतीला अशोभनीय आहे.