Pune Crime : रेल्वे स्थानकावर अवैधरित्या पिस्तूल आणि काडतुसे बाळगल्याप्रकरणी पुणे रेल्वे पोलिसांनी (Pune Railway Police) मंगळवारी (24 जानेवारी) गुजरातमधील (Gujarat) एका व्यावसायिकाला अटक केली आहे. या व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद जाणवल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडलं. चौकशी करुन झडती घेतली असता त्याच्याकडून परदेशी बनावटीचं पिस्तूल (Pistol), सहा जिवंत काडतुसे (cartridges) यांच्यासह जवळपास साडेतीन लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
अनिलकुमार रामयज्ञ उपाध्याय (वय 47 वर्षे, रा. रामेश्वर रेसिडेन्सी, सुरत) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपी व्यावसायिक सुरतवरुन बंदूक घेऊन महाराष्ट्रात आला होता. या व्यावसायिकाने बेकायदेशीरपणे पिस्तूल का बाळगलं होतं, याचा तपास सध्या सुरु आहे.
आरोपी व्यावसायिकाला पाच दिवसांची कोठडी
या प्रकरणी पोलीस हवालदार निशिकांत राऊत यांच्या तक्रारीनंतर पुणे रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्यक्तीकडे विनापरवाना पिस्तूल होती. कोर्टाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. आम्ही अधिक तपास करत आहोत, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.
पुणे रेल्वे स्टेशनवर संशयास्पद हालचाली, झडती घेतली असता पिस्तूल सापडलं
एफआयआरमधील माहितीनुसार, निशिकांत राऊत आणि रेल्वे पोलिसांतील इतर कर्मचारी मंगळवारी (24 जानेवारी) पुणे रेल्वे स्थानकावर ड्युटी करत होते. सकाळी 10.55 च्या सुमारास त्यांना रेल्वे स्थानकाच्या मुख्य गेटजवळ एक व्यक्ती संशयास्पदरित्या फिरताना दिसली. त्यांनी त्या व्यक्तीला अडवलं आणि त्याची चौकशी केली. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ एक पिस्तूल, सहा जिवंत काडतुसे, एक टॅब, तीन मोबाईल आणि काही सोन्याचे मौल्यवान साहित्य पोलिसांना सापडले.
परदेशी बनावटीचं पिस्तुल भोपाळमधल्या महिलेकडून घेतल्याची माहिती
अनिलकुमार उपाध्यायचा कपड्यांचा व्यवसाय असल्याचं एफआयआरमध्ये नमूद करण्यात आलं आहे. चौकशीदरम्यान, त्याने पोलिसांना सांगितलं की, 'मेड इन इंग्लंड' असलेलं हे पिस्तूल त्याने मध्य प्रदेशातील भोपाळमधल्या एका महिलेकडून घेतलं होतं.
रेल्वे पोलिसांनी अनिलकुमार उपाध्याय याला भारतीय शस्त्रास्त्र कायद्याच्या कलमांखाली अटक केली. पुढील चौकशीसाठी न्यायालयाने त्याला पाच दिवसांची रेल्वे पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासासाठी पोलिसांची पथकं सुरत आणि भोपाळला रवाना झाली आहेत. सुरतहून पुण्याला आलेल्या या व्यावसायिकाने बेकायदेशीरपणे पिस्तूल का बाळगलं होतं, याचा तपास सुरु आहे.
हेही वाचा
Pune Crime News : शिक्षणाचं माहेरघर की गुन्हेगारांचं शहर; पुण्यात शहरात 20 हजाराहून अधिक गुन्हेगार