Pune Bypoll election : पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीवर अजित पवारांनी दावा ठोकला. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्येच एकी नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे वज्रमूठ सैल पडणार का?, असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला जात आहे. कॉंग्रेस नेते मोहन जोशी, शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि अजित पवार यांनी पुणे पोटनिवडणुकीवर दावा ठोकला आहे. सर्वाधिक ताकद असलेल्या पक्षालाच महाविकास आघाडीकडून उमेदवारी दिली जाईल, असं या नेत्यांनी म्हणत आपल्याच पक्षाची ताकद असल्याचं स्पष्ट केलं आहे


पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीवर अजित पवारांनी दावा ठोकला. राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद जास्त असण्याकडे अजित पवारांनी बोट दाखवलं. त्यानंतर काँग्रेसने पुणे लोकसभेत त्यांचे हात कसे मजबूत आहेत, याचं गणित मांडलं. पुणे लोकसभेतील सहा विधानसभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे एक-एक आमदार आहेत. कॅन्टोन्मेंट आणि शिवाजीनगर विधानसभेत काँग्रेसचा थोडक्यात पराभव झाला. या उलट पर्वतीमध्ये राष्ट्रवादीचा मोठ्या फरकाने पराभव झाला. मग कोणाची ताकद जास्त हे सर्वश्रुत आहे, असं म्हणत मविआचा वाटपात ही जागा आम्हालाच मिळणार, असा दावा काँग्रेसने केला.


कॉंग्रेसलाच जागा मिळणार: मोहन जोशी


मोहन जोशी पुढे म्हणाले की, मागील काही वर्षांपासून पुणे शहर लोकसभा मतदारसंघ हा कॉंग्रेसचाच आहे. त्यामुळे हा मतदार संघा कॉंग्रेसकडेच राहिल. या निवडणुकीसंदर्भात निर्णय घेत असताना महाविकास आघाडीचे सर्व नेते मुंबईत एकत्र बैठक घेऊन  उमेदवारीबाबत निर्णय घेतली. महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाही आहेत आणि राजकारणही नाही आहेत. त्यामुळे फक्त भाजपचा पराभव करायचा हेच महाविकास अघाडीचं लक्ष्य असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.


एकत्र निर्णय घेऊ: संजय राऊत


शिवसेना नेत्यांनी अजित पवार यांच्या दाव्यावर काही प्रमाणात पाठिंबा दिल्याचं दिसत आहे. ते म्हणाले की, अजित पवार यांच्या म्हणण्यानुसार पुण्यात राष्ट्रवादीची ताकद असल्याचं दिसत आहे. मात्र महाविकास आघआडीतील प्रत्येक निर्णय तीन पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी एकत्र येऊन घेतला जातो. त्यामुळे पुण्यातील लोकसभेच्या जागेबाबतदेखील सर्व पक्ष एकत्र येऊन निर्णय घेणार असल्याचं संजय राऊत म्हणाले.


अजित पवारांचा लोकसभेवर दावा


अजित पवार म्हणाले की, पुण्याची पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे,अशी माझ्या आतल्या गोटातील माहिती आहे. ज्यांची जिथं जास्त ताकद आहे, तिथं त्या पक्षाच्या उमेदवाराला तिकीट द्यायचं. पुण्यात कुणाची ताकद आहे हे आधीच्या निवडणुकीत कुणाचे किती लोक निवडून आले यावर ठरते. आमची ताकद किती आहे हे माहिती आहेच. महाविकास आघाडीत ज्यांची जास्त ताकद त्यांना ती जागा मिळावी. मित्र पक्षालादेखील यावर बोलण्याचा अधिकार आहे