Chinchwad Bypoll Election:  पुण्यात कसबा (kasba peth election) आणि चिंचवड (Chinchwad Bypoll Election)   मतदार संघाच्या पोटनिवडणूका जाहीर झाल्या आहेत. येत्या 27 फेब्रुवारीला यासाठी मतदार पार पडणार आहे. या सगळ्यात दोन्ही मतदार संघात उमेदवारी कोणाला मिळेल? याची शहरात जोरदार चर्चा सुरु आहे.त्यातच चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांपैकी कोणाला उमेवारी मिळेल का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. या पोटनिवडणूकीसाठीची भाजपची भूमिका उद्या स्पष्ट होणार आहे. 


चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपची उद्या भूमिका ठरणार आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील दुपारी एक वाजता पिंपरी चिंचवडमधील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीसाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि त्यांचे लहान बंधू शंकर जगताप ही उपस्थित असणार आहेत. या बैठकीत कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत चर्चा होण्याची शक्यता असून बैठक संपताच पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे पत्रकारांशी संवाद ही साधणार आहेत. चिंचवड विधानसभेबाबत भाजपने पहिल्यांदाच भाष्य केलेलं आहे. 


चिंचवड विधानसभा मतदारसंघातून जगताप यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीला सुरुवात होताच दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे संपर्क कार्यालय पिंपळे गुरव येथे गर्दी झाली होती. त्यासोबतच लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनादेखील उमेदवारी मिळण्याची मोठी शक्यता आहे. 


कसब्यातील उमेदवार कोण?


काल (23 जानेवारी) कसबा मतदार संघासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपनेते यांच्यात बैठक झाली. या बैठकीत कसबा मतदार संघासाठी उमेदवार निश्चित होईल असं वाटत होतं. मात्र या बैठकीत उमेदवार निश्चित झाला नाही. पक्षाने निवडणुकीसाठी तयारी सुरू केली असून त्यासाठी तीन समित्या नेमल्या आहेत. तसेच इच्छुकांची नावे प्रदेशाध्यक्षांकडे पाठविली जातील. त्यानंतर उमेदवाराचे नाव दिल्लीतून घोषित केले जाणार आहे,' असे सांगत भाजपने कसबा विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांचा जीव टांगणीला ठेवला आहे. त्यामुळे चिंचवडच्या बैठकीच नेमकं काय होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 



चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच...



दोन्ही मतदार संघाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही, हे आता स्पष्ट झालं आहे. विरोधी पक्षनेते अजित पवारांनी निवडणूक बिनविरोध होण्यावर शाशंकता दर्शवली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीच्या इच्छूक उमेदवारांची यादी वाढत आहे. त्यामुळे आता उमेदवारी कोणाला मिळेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.