Pune Bypoll election : कसबा पोटनिवडणुकीच्या (Kasba Bypoll Election) उमेदवारीवरुन कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana patole) यांच्या टीकेवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil) प्रत्युत्तर दिलं आहे. कसबा पोटनिवडणुकीसाठीचा हेमंत रासनेंच्या उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. टिळकांना उमेदवारी दिल्यास निवडणूक बिनविरोध करणार का?, असं म्हणत त्यांनी नाना पटोलेंना आव्हानं दिलं आहे. हेमंत रासने यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कसबा गणपती मंदिरासमोर भाजपकडून शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे. त्यावेळी ते बोलत होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीला कसबा पोटनिवडणूक बिनविरोध करायची नाही आहे. त्यामुळे टिळकांचं नाव वापरत आहेत. माझं नाना पटोलेंना आव्हान आहे की, जर टिळक कुटुंबात उमेदवारी दिली तर बिनविरोध करणार का?, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. भाजपने मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी नाकारली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईला अर्थ उरलेला नाही, अशी टीका नाना पटोलेंनी केली होती. त्यावर चंद्रकांत पाटलांनी आव्हान दिलं आहे. ते पुढे म्हणाले, महाविकास आघाडीचंच एकमत होत नाही आहे. चिंचवड मतदार संघात उमेदवारी लक्ष्मण जगतापांच्या कुटुंबात दिली आहे त्यामुळे चिंचवडमध्ये बिनविरोध निवडणूक होणार असं घोषित करुन टाका, असंही ते म्हणाले.
ब्राह्मणांना डावलले गेलं का?
दिवंगत आमदार मुक्ता टिळकांच्या कुटुंबीयांमध्ये उमेदवारी न दिल्याने ब्राह्मण समाज नाराज झाल्याच्या कसबा मतदार संघात चर्चा सुरु आहे. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले की, समज आणि वस्तुस्थिती हे दोन वेगळे शब्द आहेत. समज निर्माण करायला फ्लेक्स लागतात. वस्तुस्थिती निर्माण करण्यासाठी काम करावं लागतं. आम्ही काम केलं आहे आणि या कामाची ब्राह्मण समाजाला जाणीव आहे. भाजपने कोणावर कधीही अन्याय केला नाही, असं ते म्हणाले.
पदयात्रेला शैलेश टिकळ उपस्थित नाही...
भाजपकडून कसबा मतदार संघासाठी हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आज मोठं शक्ती प्रदर्शन करत ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. यासाठी भाजपचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित आहेत. चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे शिवाय पुण्यातील स्थानिक नेतेदेखील उपस्थित आहेत. कसबा गणपती मंदिर ते दगडूशेठ गणपती मंदिरापर्यंत मोठी पदयात्रा काढण्यात आली. भाजप कार्यकर्त्यांकडून प्रचाराला सुरुवात होईल शिवाय सोशल मीडियावर अनेकांनी निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुकले आहे. मात्र या सगळ्या पदयात्रेत शैलेश टिकळ उपस्थित नाहीत. त्यामुळे त्यांची नाराजी यावरुन स्पष्ट होत आहे.