पुणे : समलैंगिक संबंधातून झालेल्या वादातून एका तरुणाने आपल्या समलिंगी मित्रावर कोयत्याने हल्ला केला. पुण्यातील शुक्रवार पेठेत ही घटना घडल्याची माहिती आहे. व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर आरोपी तरुणाला अटक करण्यात आली आहे.

समलैंगिक संबंधांना मान्यता देणारा कायदा मंजूर झाल्यानंतर या प्रकारचा पुण्यातील पहिलाच गुन्हा खडक पोलिस ठाण्यात दाखल झाला. शुक्रवार पेठेत राहणाऱ्या 46 वर्षीय व्यक्तीने तक्रार दाखल केली होती.

फिर्यादी हे व्यावसायिक असून लग्नानंतर वीस वर्षांनी पत्नीशी संबंध बिघडल्याने ते विलग झाले. अडीच वर्षांपूर्वी पाषाण सूस रस्त्यावर राहणाऱ्या एका तरुणाशी फिर्यादीची ओळख झाली. त्यानंतर दोघांमधील जवळीक वाढली. फिर्यादी हा आरोपी तरुणासोबत शुक्रवार पेठेतील आपल्या घरी राहायला लागला.

समलिंगी संबंध ठेवण्यासाठी फिर्यादी आरोपीकडे सातत्याने मागणी करत होता. या प्रकाराला कंटाळून बुधवारी सकाळी फिर्यादी झोपेत असतानाच तरुणाने त्यांच्यावर कोयत्याने वार केले आणि त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यामध्ये फिर्यादीच्या डोक्याावर, खांद्यावर आणि चेहऱ्यावर वार झाले आहेत.