छत्रपती संभाजीनगर : माणसाचं जीवन धकाधकीचं बनलं असून वेळेअभावी माणूस शरिराकडे, प्रकृतीकडे लक्ष देत नसल्याची ओरड सातत्याने ऐकायला मिळते. मात्र, काहीजण आपल्या तब्येतीकडे अधिक काळजीपूर्वक लक्षही देत असतात. त्यानुसार, दैनंदिन व्यायामासाठी किंवा योगासनाद्वारे आपले शरीर तंदूरुस्त ठेवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, यापूर्वीही काहीवेळा जिममध्ये ट्रेनर किंवा जिममध्ये व्यायाम करताना ह्रदयविकाराचा झटका (Heart attack) येऊन मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. आता, छत्रपती संभाजीनगरमध्येही (Sambhajinagar) अशीच एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. ज्यामध्ये, जिममधील आपल्या सहकारी मित्रांसमवेत व्यायाम करताना ह्रदयविकाराचा झटका येऊन एका उद्योजकाचा मृत्यू (death) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 


छत्रपती संभाजी नगर शहरातील एका जिम मध्ये व्यायाम करत असताना एका उद्योजकाला हृदयविकाराचा झटका आला, त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सीम्रन मोटरचे मालक कवलजीत सिंग बग्गा हे आपल्या काही सहकाऱ्यांसोबत नेहमीप्रमाणे व्यायाम करण्यासाठी जिम मध्ये गेले होते. मात्र, व्यायाम करत असतानाच ते अचानक खाली कोसळले आणि त्यांचा काही क्षणातच मृत्यू झाला. जिममध्ये ते खाली कोसळल्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी धावाधाव केली, त्यानंतर त्यांना रुग्णालयातही नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 


दरम्यान,  हा मृत्यूचा सगळा थरार जिममध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर माणसाच्या जीवाचा खरंच काही भरोसा नाही, हेच वाक्य प्रत्येकाच्या तोंडातून बाहेर निघेल. कारण, जिममध्ये कललजीतसिंग बग्गा हे आपल्या सहकाऱ्यांसमवेत व्यायाम करताना एकदत तंदुरुस्त आणि फट दिसून येतात. विशेष म्हणजे व्यायाम करतानाही त्यांची शरीरयष्टी पाहून असा काही प्रकार घडेल असे कोणालाही वाटत नाही. मात्र, काही वेळातच त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ते बाजूला गेल्याचं दिसून येतं. त्यानंतर, ते खाली कोसळतात आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचं व्हिडिओत दिसून येतं. या अकस्मात निधनामुळे त्यांच्या जिममधील सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला असून बग्गा कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 


हेही वाचा


उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणाचा खून केला; आशिष शेलारांचा हल्लाबोल, मनोज जरांगेंनाही टोला


तुमचे 12 वाजायला 10 मिनिटं शिल्लक दाखवतंय; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा अजितदादांवर 'टायमिंग शॉट'