Pune MNS News: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर होणारी शस्त्रक्रिया यशस्वी व्हावी यासाठी पुण्यातील मनसे नेते आणि कार्यकर्त्यांनी पुण्यातील शारदा गणपती मंदिरात अभिषेक केला. राज ठाकरेंच्या  54 व्या वाढदिवसानिमित्त मनसे कसबा विभागातर्फे अखिल मंडई मंडळ येथे सुप्रसिद्ध शारदा गणपती महाआरती व 550 नारळाचे तोरण अर्पण करण्यात आले.


यावेळी मनसे कामगार सेनेचे उपाध्यक्ष नरेंद्र तांबोळी, कसबा विभागाध्यक्ष गणेश भोकरे, शहर संघटक प्रल्हाद गवळी, निलेश हांडे, प्रकाश गायकवाड, अभिषेक थिटे, कृष्णा मोहिते, निता पालवे, उषा काळे, ऋषिकेश करंदीकर, अजय राजवाडे, सुमीत खरे, आशुतोष माने आदी पदाधिकारी आणि मनसैनिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन वसंत खुटवड, रवि सहाणे, सारंग सराफ यांनी केले होते.  


मनसे नेते वसंत मोरे यांनी हटके स्टाईलने वाढदिवस साजरा केला. श्वानांंसाठी आरोग्य शिबीर आयोजित केलं होतं. राज ठाकरेंचं श्वानप्रेम सगळ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त श्वान शिबीराचं आयोजन केलं, असं वसंत मोरे म्हणाले.


राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना काय आवाहन केलं होतं? 
वाढदिवसाला कुणीही भेटायला येऊ नका, जिथे आहात तिथून शुभेच्छा द्या" असं राज ठाकरेंनी वाढदिवसानिमित्त मनसैनिकांना आवाहन केले आहे. आपल्या ऑडियो पोस्टमध्ये राज ठाकरे म्हणतात की, "14 तारखेला भेटायला घरी येऊ नका. जिथे आहात तिथून शुभेच्छा द्या. कारण गेल्या अनेक दिवसांपासून माझी शस्त्रक्रिया पुढे ढकलते आहे. मध्यल्या काळात रुग्णालयात दाखल झालो पण कोरोनाचे डेड सेल्स सापडल्याने शस्त्रक्रिया रद्द झाली. आता ही शस्त्रक्रिया पुढील आठवड्यात पार पडणार आहे. आता पुन्हा तोच प्रकार नको म्हणून यावेळी वाढदिवशी  कार्यकर्त्यांना भेटणार नाही. जिथून आहात तिथूनच शुभेच्छा द्या, असं आवाहन राज ठाकरेंनी मनसैनिकांना केलं होतं.  


सध्या राज ठाकरे यांच्या पायाचं दुखणं वाढलं असून त्यांच्यावर हिप बोनची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती, परंतु त्यांच्या रिपोर्टमध्ये कोविड डेड सेल्स असल्याने ही शस्त्रक्रिया पुढे ढकलली. ही शस्त्रक्रिया पुढील आठवड्यात होणार आहे. यामुळे राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना भेटायला न येण्याचं आवाहन केलं आहे.