पुणे : उड्डाणपुलावरुन दुचाकी खाली पडल्यामुळे पुण्यात बाईकर तरुणाचा मृत्यू झाला. जगातल्या सर्वात उंच शिखरांपैकी खारदुंगला टॉपची चढाई यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आशुतोष फडकेला पुण्यातील उड्डाणपुलाने मात्र धोका दिला.
सोमवारी सकाळी पुण्यातील कर्वे रस्त्यावर असलेल्या पौड फाट्यावरील वीर सावरकर उड्डाणपुलावरुन 35 वर्षीय आशुतोष प्रवास करत होता. मात्र त्यावेळी बाईक पुलावरुन खाली कोसळल्याने गंभीर जखमी झालेल्या आशुतोषचं उपचारांपूर्वीच निधन झालं.
फडके ऑटोमोबाईल्सचा मालक असलेला आशुतोष स्वत:ची केटीएम दुचाकी घेऊन कर्वे रस्त्यावरुन पौड रोडने कोथरुड डेपोकडे जात होता. त्यावेळी पौड फाट्यावरील वीर सावरकर उड्डाणपुलावर असताना दुचाकीवरील त्याचं नियंत्रण सुटलं आणि तो दुचाकीसह पुलावरुन खाली कोसळला.
फोटो : फेसबुक
आशुतोषला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात आणण्यापुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं.
आशुतोषला दुचाकींसह चारचाकी स्पोर्टी वाहनं चालवण्याची आवड होती. त्याने जगातील सर्वोच्च शिखरांपैकी एक असलेल्या, तब्बल 18 हजार 380 फुट उंचीवर असलेल्या खारदुंगला टॉपची यशस्वी चढाई केली होती. जिथे ऑक्सिजनचीही कमतरता असते, तिथे
त्याने यशस्वीरीत्या दुचाकीने चढाई केली. मात्र पुण्यातील उड्डाणपुलाने त्याचा बळी घेतल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
कारगिलसारख्या ठिकाणीही दुचाकीने प्रवास केला होता. तर राजमाची, लवासा, महाबळेश्वर अशा घाट रस्त्यांवर फोर्स गुरखा, रॉयल एन्फिल्ड थंडरबर्ड, केटीएम ड्युक ही वाहनं चालवून रस्त्यांनाच आव्हान दिलं होतं.
फोटो : फेसबुक