Pune Bandh :  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  (Bhagat Singh Koshyari) यांच्याविरोधात 13 डिसेंबरला सर्व पक्षीय नेत्यांनी आणि  सामाजिक (Pune Bandh) संस्थांनी बंदची हाक दिली आहे. त्याला व्यापारी संघटनांनंतर आता पुण्यातील गणेशोत्सव मंडळांनीदेखील पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राज्यपालांविरोधात असलेल्या या बंदला चांगलाच प्रतिसाद मिळणार असल्याचं चित्र आहे. 


36 मंडळांकडून पाठिंबा
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमानास्पद वक्तव्ये मोठ्या पदावरील व्यक्ती तसेच काही लोकप्रतिनिधींकडून केली जात आहेत. यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत. या वक्तव्याचा खेदजनक निषेध व्यक्त करत आहोत, असं गणेशोत्सव मंडळांकडून सांगण्यात आलं आहे. श्री तांबडी जोगेश्वरी मंडळ, केसरीवाडा मंडळ, श्री तुळशीबाग गणपती सार्वजनिक गणपती मंडळ ट्रस्ट, अखिल मंडई मंडळ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती यांच्यासोबत शहरातील 36 गणेशोत्सव मंडळांनी या बंदला पाठिंबा दिला आहे.


छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. ते आमचे प्रेरणास्थान आणि स्फूर्तिस्थान आहेत आणि कायम राहतील. देशातील इतर सर्वच महापुरुष आणि महान स्त्री व्यक्तिमत्वांबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. या सर्वांचे देशाप्रती असलेल्या अमूल्य योगदानाचे आम्हाला भान आणि अभिमान हे दोन्ही आहे, असं मत अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी व्यक्त केलं आहे. 


गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजां बद्दल अपमानास्पद व्यक्तव्ये मोठ्या पदावरील व्यक्ती तसेच काही लोकप्रतिनिधींकडून केली जात आहेत. यामुळे आमच्या भावना तीव्र दुखावल्या गेल्या आहेत. या गोष्टीचा आम्ही खेदजनक निषेध व्यक्त करीत आहोत. आपणच निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आमच्या श्रद्धास्थानाबद्दल अशी बेताल वक्तव्य करीत आहेत. त्यामुळे तीव्र निषेध व्यक्त करत बंदला पाठिंबा देत असल्याचं देखील गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट केलं आहे. यापुढे राजकीय किंवा अराजकीय व्यक्तीने, छत्रपती शिवाजी महाराजां बद्दल एक शब्द जरी चुकीचा किंवा अपमानास्पद काढला, तर अजिबात खपवून घेतले जाणार नाही. याची नोंद घ्यावी आणि भविष्यात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना याचे भान राखावे, असे आवाहनही यावेळी गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींनी केले आहे.


पिंपरीतील बंद यशस्वी
दरम्यान,  संभाजी बिग्रेड,काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस ,शिवसेना,आर.पी.आए.ई, गणेशोत्सव मंडळ आणि व्यापाऱ्यांकडून उद्या (13 डिसेंबर) बंदची हाक दिली आहे. 8 डिसेंबरला पिंपरी-चिंचवडमध्ये बंदची हाक दिली होती. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. यात संभाजीराजे छत्रपती देखील सहभागी झाले होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात महाराष्ट्र बंद करण्याचा प्रवास सुरु झाला आहे, असा इशारा माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला होता.