पिंपरी-चिंचवड : देशांतर्गत तसेच पाकिस्तानसह विदेशातील दहशदवादी विचारसरणीच्या लोकांच्या संपर्कात असलेल्या एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. पुण्याच्या चाकणजवळ पुणे दहशतवाद विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. तर त्याच्या एका साथिदाराला पंजाबमध्ये अटक करण्यात आली आहे.


हरपालसिंग प्रतापसिंग नाईक असं या 42 वर्षीय संशयिताच नाव आहे. मूळचा पंजाब येथील रोपर जिल्ह्यातील असून सध्या तो कर्नाटकातील बेल्लारी येथे राहत होता. स्वतंत्र खलिस्तान निर्मितीचा तो पुरस्कर्ता आहे. पुणे दहशतवाद विरोधी पथक अर्थात एटीएसने 2 डिसेंबरला चाकण येथून त्याला अटक केली होती.

देशी बनावटीचे पिस्तुल आणि 5 जिवंत काडतुसं त्याच्याकडून जप्त करण्यात आली होती. मात्र या अटकेची गुप्तता पाळण्यात आली होती. 3 डिसेंबरला न्यायालयाने हरपालसिंगला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्याला आज पुन्हा न्यायालयात हजर केल्यानंतर चौकशीत समोर आलेल्या अनेक धक्कादायक बाबी एटीएसने मांडल्या.

हरपालसिंग त्याच्या साथीदारांच्या मदतीने दहशतवाद्यांची टोळी बनवून देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण करण्याच्या तयारीत होता. त्यासाठी तो दहशतवादी कृत्याच्या तयारीत होता. हरपालसिंग इंटरनेट आणि सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करुन देशातील तरुणांना दहशतवादी कारवाया करण्यास भडकवत असे. तसेच याचाच शस्त्र जमावण्यास वापर करायचा.

पाकिस्तान आणि विदेशातील दहशतवादी विचारसरणी असलेल्यांच्या संपर्कात असल्याचा दाट संशय आहे. त्यामुळेच न्यायालयाने आज त्याच्या पोलीस कोठडीत सात दिवसांची वाढ केली. दुसरीकडे पंजाबच्या सरहद पोलीसांनी मोईन नावाच्या त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. लवकरच पुढील कारवाईसाठी पुणे एटीएस त्याला ताब्यात घेणार आहे.