पिंपरी-चिंचवड : विवाह ठरत नसल्याच्या नैराश्यातून एका एचआयव्हीग्रस्त मुलानं स्टंटबाजी केली आहे. पिंपरी-चिंचवड परिसरातील रावेतमध्ये बांधकामासाठी उभारलेल्या एका क्रेनवर चढून या तरुणानं आंदोलन केलं.


क्रेनवर उभं राहत मी एचआयव्हीग्रस्त आहे. माझं लग्न ठरत नाही. माझ्यासाठी मुलगी बघा, अशी हाक हा तरुण देत होता. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांची समजून काढली. त्यानंतर तब्बल दीड तासांनी त्याला खाली उतरवण्यात यश आलं.


रावेत येथे बांधकामाच्या कामासाठी उभारलेल्या क्रेन वर उभा राहिला होता. 50 ते 60 फूट उंचीच्या क्रेन उभ्या राहिलेल्या या तरुणाला पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी याठिकाणी जमली होती. उपस्थित नागरिकांनी पोलीस आणि अग्निशमन दलाला याची कल्पना दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले, मात्र अग्निशमन दलाचे जवान एका ठिकाणी प्रात्यक्षिकात व्यस्त होते. तेथून त्यांना पाचारण करण्यात आलं.


उंच शिडीच्या आधारे अग्निशमन दलाचे जवान त्या तरुणांपर्यंत पोहचले. मात्र तो तरुण खाली उतरायला तयारच होत नव्हता. अखेर 'तुझ्यासाठी मुलगी पाहूण तुझं लग्न लावून देऊ' असं आश्वासन दिल्यानंतर तो तरुण खाली उतरायला तयार झाला.


एचआयव्हीची लागण झालेला हा तरुण आजच नाशिकहून पिंपरी-चिंचवडमध्ये आला होता. तो मूळचा नांदेड येथील असून, पोटाची भूक भागवण्यासाठी मिळेल ते काम करतो. वयाच्या विसाव्या वर्षी त्याला एचआयव्हीची लागण झाली. त्यामुळे त्याला कुणी मुलगी द्यायला तयार नाही. याच नैराश्यातून त्याने आज हा उपद्व्याप केला. या सर्व प्रकारमुळे पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी चांगलीच धावपळ झाली.