पुणे : पुण्यात आजचा सोमवार हा अपघातवार ठरला आहे. कारण पुणे-बंगळुरु माहामार्गावर आज पहाटे चार ते सकाळी अकरा वाजेपर्यंत एकूण पाच अपघात झाले. एकापाठोपाठ एक झालेल्या अपघातांच्या या मालिकेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर आठ जण जखमी झाले आहेत.


अपघात पहिला : पुणे-बंगळुरु महामार्गावर कात्रज बोगद्याकडून नऱ्हेच्या दिशेने जाताना भूमकर पुलावर आज पहाटे दोन ट्रकचा भीषण अपघात झाला. दारुची वाहतूक करणाऱ्या ट्रकला भरधाव ट्रकने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. त्यात एक गंभीर जखमी तर दोन किरकोळ जखमी झाले आहे.


अपघात दुसरा  : दरम्यान हा अपघात झालेला असतानाच काही अंतरावर स्पेअरपार्ट वाहतूक करणारा आयशर ट्रक उलटून दुसरा अपघात झाला.


अपघात तिसरा : तर तिसरा अपघात हा नऱ्हे येथील अपघाताची पाहणी करण्यासाठी घटनास्थळी जाणाऱ्या पोलिसांच्या गाडीला झाला. भरधाव कंटनेरने सिंहगड पोलिसांच्या गाडीला उडवले. यामध्ये गाडीचा चक्काचूर झाला असून सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.


अपघात चौथा : नवीन कात्रज बोगद्याजवळच चौथा अपघात झाला. दरी पुलाकडून साताऱ्याहून-मुंबईकडे जाणाऱ्या आणखी एका कंटेनरने चार वाहनांना उडवले. यामध्ये एका रिक्षा आणि पोलिसांच्या गाडीचा चुरडा झाला असून सहा महिन्यांच्या बाळासह तीन जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय दोन जणांचा या अपघातात मृत्यू झाला.


अपघात पाचवा : पुणे-बंगळुरु महामार्गावरचा आजचा पाचवा अपघात एक कार आणि ट्रक यांच्यात झाला. अर्टिगा कार आणि ट्रक एकमेकांना घासून गेल्याने हा अपघात झाला. सुदैवाने यामध्ये कोणाला फारशी दुखापत झालेली नाही किंवा जीवितहानी देखील झालेली नाही. परंतु वाहनांचं नुकसान झालं आहे.