पुणे: पुण्याजवळ (Pune News) घडलेल्या दोन भीषण अपघातामध्ये (Pune Accident) आत्तापर्यंत 12 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पुण्याच्या जवळच हे दोन्ही अपघात (Pune Accident) झाले आहेत. काल (गुरूवारी) जेजुरी जवळची आळंदी पंढरपूर पालखी महामार्गावर झाला असून त्यात तिघे ठार झाले आहेत. एसटी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला. तर आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातामध्ये (Pune Accident) आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जेजुरीजवळ झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू
काल(गुरूवारी) सासवड जेजुरी रस्त्यावर बेलसर फाट्या जवळ उड्डाणपूलाचे काम सुरू आहे. या ठिकाणी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास रमेश किसन मेमाणे (वय वर्षे 60), संतोष दत्तात्रय मेमाणे हे 40 वर्षीय आणि 65 वर्षीय पांडुरंग दामोदर मेमाणे हे तिघेजण रा.बोरमाळ वस्ती दुचाकीवरून रस्ता क्रॉस करत असताना एसटी बसने त्यांना जोराची धडक दिली. दुचाकीला जोराची बसची धडक बसली. यावेळी दुचाकी काही अंतरावर फरफटत गेली. यामध्ये तिघांचाही जागीच मृत्यू झाला. दरम्यान या घटनेनंतर तातडीने त्यांना उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पुणे नाशिक मार्गावर भीषण अपघात, 9 जणांचा जागीच मृत्यू
तर आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघाताची (Pune Accident) घटना घडली आहे. या घटनेमध्ये एकूण नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्स ऑटो गाडीला पाठीमागून आयशर टेम्पोने जोराची धडक दिली त्यामुळे ही घटना घडली. आयशरची धडक बसल्यानंतर मॅक्स ऑटो चेंडू प्रमाणे पुढे फेकली गेली आणि बसला जाऊन धडकली. या भीषण अपघातामध्ये चार महिला, चार पुरुष आणि एका बाळाचा जागीच मृत्यू झाला आहे. इतर तिघे जखमी आहेत. जखमींना तातडीने शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. त्यामुळे मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.(Pune Accident)
मृत व्यक्तींची नावे
1) देबुबाई दामू टाकळकर वय 65 वर्ष रा. वैशखखेडे तालुका जुन्नर जिल्हा पुणे
2)विनोद केरूभाऊ रोकडे 50 वर्ष राहणार कांदळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे
3)युवराज महादेव वाव्हळ वय 23 वर्ष रा 14 नंबर कांदळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे
4)चंद्रकांत कारभारी गुंजाळ वय 57 वर्ष राहणार कांदळीतालुका जुन्नर जिल्हा पुणे
5)गीता बाबुराव गवारे वय 45 वर्षे 14 नंबर कांदळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे
6)भाऊ रभाजी बडे वय 65 वर्ष रा नगदवाडी कांदळीतालुका जुन्नर जिल्हा पुणे
7)नजमा अहमद हनीफ शेख वय- 35 वर्ष रा.गडही मैदान खेड राजगुरुनगर
8)वशिफा वशिम इनामदार वय 5 वर्ष
9)मनीषा नानासाहेब पाचरणे वय 56 वर्षे रा.14 नंबर तालुका जुन्नर जिल्हा पुणे
आमदार शरद सोनवणे घटनास्थळी दाखल
घटनास्थळी आमदार शरद सोनवणे दाखल झाले, त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की, नारायणगावमध्ये ही अपघाताची दुर्दैवी घटना घडली आहे. फार गंभीर अपघात झाला आहे. पुणे नाशिक हायवे वरती अपघात झाला आहे. एका आयशर टेम्पो चालकाने मागून प्रवासी वाहतूक करणाऱ्या या वाहनाला धडक दिली. ते वाहन पुढे जाऊन एसटीला धडकले आणि या झालेल्या भीषण अपघातामध्ये अनेक जण दगावले. काही जण जखणी झाले आहेत, आम्ही आता सरकारी दवाखान्यामध्ये त्यांची भेट घेण्यासाठी जाणार आहोत. काही लोकांचा मृत्यू झाला आहे, तर काही जण जखमी आहेत, काही महिलांचा समावेश आहे अशी माहिती कळते. हा अपघात गंभीर होता प्रत्यक्षदर्शींनी याबाबत सांगितलं या आयशरने प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनाला उडवलं आणि तो पळून गेला. पण, पोलिसांनी त्याला शोधण्याचा काम केलं आहे. पुढे आयशरला पकडलेलं आहे. त्यामुळे खरा अपघात या आयशर चालकामुळे घडला आहे, अशी माहिती यावेळी बोलताना आमदार शरद सोनवणे यांनी दिली आहे.