पुणे : पुण्याच्या धामणे भागात शेतकरी कुटुंबातील तिघांची हत्या झाल्यानं खळबळ उडाली आहे. दरोडा टाकायला आलेल्या अज्ञातांच्या हल्ल्यात या तिघांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे.


मृतांमध्ये आई-वडील आणि मुलाचा समावेश आहे, तर सून आणि नातू हल्ल्यात जखमी झाले आहेत. दोन नातू यातून सुदैवाने बचावले आहेत. नथू फाले, छबाबाई नथू फाले आणि मुलगा आक्रिनंदन उर्फ आबा फाले अशी मृतांची नावं आहे.

तिघांच्या डोक्यात फावड्याने हल्ला करण्यात आला होता. हल्ल्यात बचावलेल्या सुनेने काही अंतरावर असणाऱ्या घरातील नागरिकांना याची कल्पना दिली. त्यांनी तातडीनं पोलिसांना माहिती देताच, तळेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

घटना पाहता हल्लेखोर दरोडा टाकण्यासाठी नव्हे तर हत्या करण्यासाठी आले असल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये सुरु आहे.



मावळ आणि लोणावळा परिसरात हत्येची ही पहिलीच घटना नसून गेल्या 25 दिवसात चार घटनांमध्ये सात जणांची हत्या झाली आहे.

3 एप्रिल - लोणावळ्यातील सिंहगड महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनीची निर्घृण हत्या

20 एप्रिल - तळेगाव दाभाडे येथील घोरावडेश्वर डोंगराच्या पायथ्याला एका महिलेची हत्या

23 एप्रिल - सांगवडे येथील महिला सरपंचाच्या पतीची हत्या

25 एप्रिल - धामणे गावात सशस्त्र दरोड्यात आई-वडील आणि मुलाची हत्या

यापैकी सांगवडे येथील हत्ये प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. मात्र मुख्य आरोपी फरार आहे. तर अन्य हत्यांतील आरोपींपर्यंत अद्यापही पोलिस पोहचू शकलेले नाहीत. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.