पुणे : पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा यंदा शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा होणार आहे. या निमित्ताने शतकोत्तर रौप्यमहोत्सवाचा लोगो लॉन्च करण्यात येणार आहे. परंतु त्यात लोकमान्य टिळक यांचा फोटो लावणार नाही, असं पुणे महापालिकेने स्पष्ट केलं आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी या महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. मात्र गणेशोत्सवाच्या जनक वादावरुन भाऊ रंगारी मंडळ आणि लोकमान्य टिळक गणेशोत्सव मंडळांमध्ये वाद सुरु आहे, त्यामुळे पुणे महापालिकेने सावध भूमिका घेतली आहे.

काय आहे वाद?
पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाला 125 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने पुणे महापालिकेकडून अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्ताने अनेक कार्यक्रम पत्रिका छापण्यात आल्या आहेत, फ्लेक्स तयार केले आहेत. मात्र त्यावर लोकमान्य टिळकांच्या फोटोऐवजी गणपतीचा फोटो असेल, असा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या निर्णयाला वादाची पार्श्वभूमी आहे.

मानाच्या पाच गणपतींपैकी एक असलेल्या भाऊ रंगारी गणपती मंडळाचा दावा आहे की, "लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात करण्याच्या दोन वर्ष आधी भाऊ रंगारी यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. त्यामुळे यंदा शतकोत्तर रौप्य वर्ष नाही तर त्याआधीच गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. या संदर्भातील पुरावे आम्ही सातत्याने सादर केले आहेत.

यावरुन वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे पत्रिका आणि फ्लेक्सवर लोकमान्य टिळक किंवा भाऊ रंगारी यांच्या फोटोऐवजी फक्त गणपतीचा फोटो लावायचा, असा निर्णय महापालिकेने घेतला आहे.