पुणे : विद्येचं माहेरघर म्हणवल्या जाणाऱ्या पुणे शहरात शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील वडगाव परिसरातील एका महाविद्यालयात शिकवणाऱ्या प्राध्यापकाने विद्यार्थिनीला पास करण्यासाठी चक्क शरीरसुखाची मागणी केल्याची घटना उघडकीस आली.


संदीप कांबळे असं शिक्षकाचं नाव आहे. या शिक्षकाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडगाव बुद्रुक भागामध्ये असणाऱ्या श्री शिवछत्रपती कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात हा सर्व प्रकार घडला.

संदीप कांबळे हा विद्यार्थिनीला फोन करून ‘तुला पास व्हायचं असेल तर आपण एका लॉजवर जाऊ, मग मी तुला पास करतो’ म्हणून फोन करत होता.

शिक्षकाच्या अशा मागणीने घाबरलेल्या विद्यार्थिनीने याची माहिती आई-वडिलांना दिली. कुटुंबीयांनी पालकसंघटनेचे शिवा पासलकर यांच्याशी संपर्क साधत त्यांना सर्व घटना सांगितली. त्यानंतर आता हवेली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. संदीप कांबळे या शिक्षकाला पोलीसांनी अटक केली आहे.