PM Modi Visit To Dehu : पिंपरी चिंचवड : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्याच्या देहूमध्ये येणार आहेत. संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीचे अन् शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. यासाठी देहू संस्थानने मार्च महिन्यात मोदींना दिल्लीत जाऊन आमंत्रण दिलं होतं. ते आमंत्रण त्यांनी स्वीकारलं असून मोदींनी येत्या 14 जूनची वेळ दिली आहे, अशी माहिती देहू संस्थानने दिली आहे. इतिहासात पहिल्यांदाच देशाचे पंतप्रधान श्रीक्षेत्र देहू इथे येणार आहेत.


संत तुकाराम महाराज संस्थान आणि आचार्य तुषार भोसलेनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमंत्रण देण्यासाठी दिल्लीला गेले होते. 29 मार्चला त्यांची भेट ही घडली. तेव्हाच पंतप्रधानांनी मी येईन असा शब्द दिला होता. तोच शब्द मोदींनी पाळल्याचा दावा आता केला जात आहे. आषाढी वारी पूर्वी म्हणजेच 14 जूनला मोदींनी तशी वेळ दिली आहे. संत तुकाराम महाराजांची मूर्ती आणि शिळा मंदिराचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. यासाठीच्या तयारीला आता संस्थान लागलेलं आहे. अनेक दिंड्यांना यावेळी आमंत्रित केलं जाणार आहे.


29 मार्चच्या भेटीत काय घडलं?
देहू देवस्थानचे अध्यक्षांसह सात विश्वस्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यासाठी दिल्ली दरबारी गेले होते. यावेळी मोदींना तुकोबांची पगडी, गाथा, मूर्ती, विणा, चिपळी, तुळशीचे हार आणि शाल देत लोकार्पण सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं होतं. देवस्थानने दिलेला सन्मान मोदींनी स्वीकारला आणि मी नक्की येईल असं आश्वासन दिलं होतं.  "तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचं लोकार्पण माझ्या हस्ते झालं तर मी माझं भाग्यच समजेन," असं मोदी म्हणाले होते. तुकोबांची शिकवण घेऊन आतापर्यंत या पिढ्यांनी सुरु ठेवलेलं संत तुकाराम महाराज आणि त्यांच्या पिढ्यांचे कार्य समाजहिताचं आहे. याची कल्पना मोदींना होतीच कारण या आधी 'मन की बात' मध्ये आषाढी पायी वारीचा उल्लेख केला होता. यावरुनच मोदींची वारकरी संप्रदायाबद्दलची भावना सर्वांसमोर आली होती. म्हणूनच ते देहू नगरीत येतील असा विश्वास देहू संस्थानला होता.


पंतप्रधान नरेंद्रमोदी ज्या लोकार्पण सोहळ्यासाठी येणार आहेत. त्या शिळा मंदिराची पायाभारणी प्रतिभाताई पाटील यांनी राष्ट्रपती असताना केली होती. तेव्हापासून सुरु असलेल्या कामाला कोरोना काळात चांगली गती मिळाली. संपूर्ण दगडात तेही कोरीव काम करुन हे मंदिर उभारलेलं आहे. जे आता पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पणासाठी प्रतीक्षेत आहे. हिच प्रतीक्षा आता 14 जून रोजी संपणार यावर जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे.