पुणे: बातमी आहे पुणेकर आणि संपूर्ण महाराष्ट्राची चिंता वाढवणारी..कारण आजवर गडचिरोलीच्या जंगलापर्यंत मर्यादित असलेला नक्षलवाद अत्यंत बेमालूमपणे पुणे, नागपूर, ठाणे सारख्या शहरातील सामान्य वस्त्यांपर्यंत पोहोचला आहे आणि नक्षलवादाचा खासकरून शहरी नक्षलवादाचा नवा टार्गेट मुंबई पुणे दरम्यानचा औद्योगिक बेल्ट असल्याची धक्कादायक माहिती ही समोर आली आहे. नुकतच पुण्यात प्रशांत उर्फ लॅपटॉप कांबळेला (Prashant Jalinder Kamble) एटीएसने अटक केली. तो गेले अनेक वर्ष पुणे आणि जवळपासच्या भागात गोपनीय पद्धतीने राहून नक्षलवाद्यांसाठी काम करत होता.(Prashant Jalinder Kamble)
तपास यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे अनेक वर्षांपूर्वी जंगलातून विशेष टास्क घेऊन बाहेर पडल्यापासून लॅपटॉप कांबळेने कधी आदिवासी मुलांना शिकवण्याचे काम केले, तर कधी एखाद्या एनजीओमध्ये काम केले, अगदी पुण्यात डिलिव्हरी बॉय म्हणून काम करून तो शेकडो पुणेकरांच्या घरापर्यंत ही जात होता. प्रशांत उर्फ लॅपटॉप कांबळे जंगलातून निघून पुणे परिसरात सक्रीय आहे, याची माहिती मिळाल्यामुळे महाराष्ट्राच्या नक्षलविरोधी पथकाने (ANO) त्याच्या नातेवाईकांच्या माध्यमातून त्याला आत्मसमर्पण करण्यासाठी अनेक वेळेला संपर्क केले होते, मात्र प्रत्येक वेळी त्याने आत्मसमर्पण करण्यास नकार दिले. कारण तो नक्षलवाद्यांच्या विचाराने प्रभावित होता आणि नक्षलवाद सोडायला तयार नव्हता. आता त्याला अटक झाल्यानंतर एटीएस आणि नक्षल विरोधी अभियानाचे पथक त्याची चौकशी करणार आहे.. मात्र, तपास यंत्रणांना शंका आहे की प्रशांत उर्फ लॅपटॉप कांबळे पुणे, खोपोली, रायगड या भागातील औद्योगिक पट्ट्यात सक्रीय राहून पुणे - मुंबई दरम्यान च्या औद्योगिक पट्ट्यात नक्षलवादी विचारसरणी पेरण्याच्या जुन्या उद्दिष्टासाठी कार्यरत होता.
कोण आहे प्रशांत उर्फ लॅपटॉप कांबळे
* 2011 पूर्वी पुण्यातील एका झोपडपट्टी मध्ये राहून कम्प्युटर्स आणि लॅपटॉप दुरुस्तीचा काम करत होता.* एका सांस्कृतिक मंचाच्या माध्यमातून थेट नक्षलवाद्यांपर्यंत पोहोचला.* नक्षलवाद्यांच्या कोरची कुरखेडा दरेकसा या KKD दलम मध्ये सहभागी होऊन शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण घेतले.* मिलिंद तेलतुंबडे सारख्या टॉपच्या नक्षल कमांडर सोबत अनेक एन्काऊंटर्स मध्ये सहभागी झाला. * प्रशांत कांबळे सोबत त्याच काळात संतोष शेलार नावाचा तरुणही पुण्यातून अशाच पद्धतीने बेपत्ता होऊन थेट नक्षलवाद्यांसोबत सहभागी झाला होता.* अनेक वर्ष जंगलातील नक्षलवाद्यां सोबत काम केल्यानंतर त्यांच्याकडून नवीन टास्क मिळवून प्रशांत कांबळे शहरी भागात परतला आणि पुण्यात भूमिगत राहून काम करू लागला.
शहरातील मुलांची माथी भडकवून, त्यांना खोट्या माओवादी क्रांतीचे स्वप्न दाखवून, कशा पद्धतीने जंगलातील नक्षलवादापर्यंत नेले जाते आणि त्यानंतर आवश्यकतेनुसार शहरी भागात वापरले जाते, याचेच प्रशांत कांबळे संतोष शेलार, राजा ठाकूर सारखे.राज्यात अनेक तरुण उदाहरण असल्याचे दिसून येत आहे. तरुणांच्या प्रकरणातून आपल्याला दिसून येत आहे. विशेष म्हणजे 2011 मध्ये एटीएसने पश्चिमी घाट परिसरात नक्षलवाद वाढवण्यासाठी खंडणी गोळा करण्याचा एक गुन्हा दाखल केला होता. त्याप्रकरणी प्रशांत कांबळे वॉन्टेड होता आणि त्याच प्रकरणी एटीएसने त्याला अटक केली आहे. प्रशांत कांबळे सारख्या प्रशिक्षित नक्षलवाद्यांच्या माध्यमातून नक्षलवादी पुणे सारख्या औद्योगिक क्षेत्रातील कामगारांमध्ये घुसखोरी करून शहरी नक्षलवादाची मोठी फळी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत का अशी शंका या घटनेनंतर निर्माण झाली आहे. प्रशांत कांबळेचे गेले अनेक वर्षातील पुण्यातील गोपनीय वास्तव्य त्याकडेच संकेत करणारे आहे.