पुणे : शहरातील टोळीयुद्धाच्या घटनेनंतर आता सामान्य नागरिकांवरही गुंडांच्या हल्ल्यांचा धोका वाढताना दिसतो आहे. कोथरूडमध्ये बुधवारी उशिरा रात्री घडलेल्या दुहेरी हल्ल्यामुळे निलेश घायवळ टोळी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गाडीला साईड न दिल्याच्या किरकोळ कारणावरून सुरुवात झालेल्या वादातून गोळीबार झाला. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत दुसऱ्या व्यक्तीवर कोयत्याने वार करण्यात आला. ही घटना कोथरूड पोलिस (Kothrud Crime News) ठाण्यापासून केवळ शंभर मीटर अंतरावर, मुठेश्वर मित्रमंडळाजवळ बुधवारी (दि.१७) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. गोळीबारात प्रकाश मधुकर धुमाळ (३६, रा. लोकमान्य कॉलनी, गणेशनगर, थेरगाव) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धुमाळ हे मित्रांसोबत रस्त्यावर उभे असताना, दुचाकीवरून आलेल्या गुंडांशी त्यांचा वाद झाला. या दरम्यान मयूर कुंबरे याने पिस्तूलातून सलग तीन गोळ्या झाडल्या, त्यापैकी एक गोळी धुमाळ यांच्या मांडीला लागली. जीव वाचवण्यासाठी त्यांनी जवळील पाण्याच्या टाकीआड धाव घेतली. दरम्यान या घटनेबाबत परिमंडळ ३ पोलिस उपायुक्त, संभाजी कदम, यांनी माहिती दिली.(Kothrud Crime News)
गोळीबारात जखमी झालेले, प्रकाश धुमाळ हे खेड-शिवापूर येथे त्यांच्या मित्रांसह पार्टी करण्यासाठी गेले होते. एका मित्राला सोडण्यासाठी ते कोथरूड परिसरात आले होते, मित्रासोबत तिथे ते गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी दुचाकीवरून घायवळ गँगचे गुंड तेथे आले. त्यांच्यातील एकाने धुमाळ यांच्यावर गोळीबार केला. गोळी प्रकाश धुमाळ याच्या मांडीला लागली. प्रकाश धुमाळ याची प्रकृती स्थिर असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. प्रकाश धुमाळ यांच्यावर गोळीबार केल्यानंतर त्यांनी दहा मिनीटांनी पुढे जाऊन आणखी एकावर हल्ला केला.
दोन्ही तक्रारींत काय म्हटलंय
प्रकाश धुमाळ यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीमध्ये आरोपींनी 'तुला लय माज आला आहे का? इथे कशाला थांबला आहे. हा आमचा एरिया आहे, असे म्हणत रोहित ठोक रे यांना, मयऱ्या खाली उतरून बघरे यांना, यांची आज विकेटच टाकू' असे म्हणत गोळीबार केला. तेथून पुढे १० मिनिटांनी आरोपींना वैभव साठे हा त्याचे मित्र सुनील हरळय्या आणि यश गोडावत यांच्यासोबत सागर कॉलनी येथील एका घरासमोर बसलेला दिसला.
दुसऱ्या हल्ल्याबाबतच्या फिर्यादीत काय म्हटलंय
मयूर कुंबरे आणि सुनील हरळय्या यांच्यातील जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी सुनील याला शिवीगाळ करीत 'याला मारून टाका, सोडू नका' असे म्हटल्याने हरळय्या तेथून पळून गेला. यामुळे चिडलेल्या आरोपींनी आपला मोर्चा वैभव साठे याच्याकडे वळवत 'त्याच्या कपाळाला पिस्टल लावत, तू सुनील सोबत फिरतो का... तुला पण जिवंत सोडणार नाही, असे म्हणत गणेश राऊत याने त्याच्याकडील कोयत्याने वैभव साठेवर हल्ला केला', असे म्हटले आहे.