मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांच्यावर शनिवारी गोळीबार झाला.या घटनेमध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोरच, बांद्रा पूर्वेत खेरवाडी परिसरात ही घटना घडली आहे. तीन अज्ञात व्यक्तींनी बाबा सिद्दिकी (Baba Siddique)यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या असून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबधितांना ताब्यात घेतल्यानंतर अनेक खुलासे समोर येत आहेत. अशातच या घटनेबाबत अनेक धागेदोरे समोर येत आहेत, मात्र या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. यासंबधी त्यांनी सोशल मिडियावर पोस्ट लिहून काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
काय म्हणालेत प्रकाश आंबेडकर?
बाबा सिद्दीकी यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी पोलीस आणि राजकारणी लोकांची दिशाभूल का करत आहेत? लॉरेन्स बिश्नोई टोळीने कॉन्ट्रॅक्ट किलिंग घडवून आणले हे खरे आहे. पण ते कोणाच्या सांगण्यावरून केले? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मिडिया एक्स (पुर्वीचे ट्विटर) वरती केला आहे.
ॲड. आंबेडकर यांनी बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी अनेक सवाल उपस्थित केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, ही राजकीय हत्या होती का? पोलीस कोणाला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत? लॉरेन्स बिश्नोईचे लक्ष वेधण्यासाठी बाबा सिद्दीकी यांनी कोणत्या काळ्या हरणाची शिकार केली? बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर ॲड. आंबेडकर यांनी महाराष्ट्र सरकारवर कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याचे म्हणत हल्ला चढवला होता. त्यांनी सरकारच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
सिद्दिकींच्या मारेकऱ्यांची घरी काय सापडलं?
बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याने त्यांचा मृत्यू झाला. गुरमैल सिंह, धर्मराज कश्यप, शिवकुमार उर्फ शिव गौतम अशी गोळीबार करणाऱ्या तीन आरोपींची नावे आहेत. तर चौथा आरोपीचं नाव मोहम्मद झिशान अख्तर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. बाबा सिद्दीकींची गोळ्या घालून हत्या करणारे आरोपी 2 सप्टेंबरपासून कुर्ल्यात वास्तव्य करत होते. 14 हजार रूपये भाड्याच्या खोलीत हे आरोपी वास्तव्य करत होते. बाबा सिद्दीकींची हत्या करण्याचा कट कुर्ल्यातील एका चाळीत या चार आरोपींमध्ये शिजला. गेल्या 40 दिवसांपासून हे आरोपी कुर्ल्यातील चाळीत राहून सिद्दीकींच्या ऑफिसची रेकी करत होते. बाबा सिद्दीकींची हत्या केल्यानंतर ते आरोपी प्रत्येकी 50 हजार रूपये वाटून घेणार होते. हरियाणातील कत्तर जेलमध्ये तिघे एकमेकांच्या संपर्कात आले होते. दरम्यान, मुंबईतील कुर्ला येथील पटेल चाळीत आरोपी राहत असलेल्या घराचे फोटो समोर आले आहेत. चाळीत फक्त तीन ते चार घरं आहेत, त्यामुळे आरोपींना पटेल चाळीची राहण्यासाठी निवड केली अशी माहिती देखील समोर येत आहे.