पुणे : साप्ताहिक सकाळचे माजी संपादक आणि विचारवंत-लेखक सदा डुंबरे यांचे पुण्यात करोनामुळे निधन झालं. ते 72 वर्षांचे होते. गेल्या 15 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. कोरोनाची बाधा झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अखेर आज (गुरुवारी) त्यांची प्राणज्योत मालवली.
सदा डुंबरे हे मूळचे पुण्यातील जुन्नर तालुक्यातील, त्यांचा जन्म जुन्नरमधील ओतूर येथे झाला होता. त्यांचं शिक्षण पुण्यात झालं. पुणे विद्यापीठातूनच त्यांनी पत्रकारितेची पदवी घेतली. पुणे विद्यापीठाच्याच वृत्तपत्र आणि संज्ञापन विभागात अतिथी प्राध्यापक म्हणून ते काम करत होते. तसेच अभ्यास मंडळाचे अध्यक्ष, 'इंडसर्च' या व्यवस्थापनशास्त्र संस्थेच्या अभ्यासमंडळाचे सदस्य अशी पदं त्यांनी भूषवली.
सदा डुंबरे यांनी सकाळमधून पत्रकारितेची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी कोल्हापूर सकाळचे संपादक पद भूषवलं. त्यानंतर ते साप्ताहिक सकाळचे संपादक झाले. सुमारे 21 वर्ष ते साप्ताहिक सकाळचे संपादक होते. या पदावरुनच ते निवृत्त झाले. त्यांनी अनेक सामाजिक आणि राजकीय विषयांवर लेखन केलं. शब्दरंग, प्रतिबिंब यांसह विविध विषयांवर त्यांनी पुस्तकं लिहिली. अनिल अवचट यांच्यावरील 'वेध अवलियाचा' या पुस्तकाचं संपादनंही त्यांनी केलं.