नारायणगाव, पुणे : मागील निवडणूक प्रचारादरम्यान खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी दिलेली बैलगाडा शर्यत बंदी उठवणार, बायपास रस्त्यांची व राष्ट्रीय महामार्गांची कामे मार्गी लावणार या 3 प्रमुख आश्वासनांची त्यांनी केलेली पूर्तता आणि विविध प्रकल्पांसाठी केलेल्या पाठपुराव्याचा सविस्तर घटनाक्रम सांगणारा 'विकासपर्व' हा कार्य अहवाल प्रकाशित करुन मागील 5 वर्षात काय केलं याची आढावा मतदारांसमोर मांडला आहे.
निवडणूक प्रचारात मतदारांना बैलगाडा शर्यत बंदी उठविण्याचे तसेच रखडलेल्या बायपास रस्त्यांची कामे आणि राष्ट्रीय महामार्गांची कामे मार्गी लावणार अशी 3 प्रमुख आश्वासने दिली होती. त्यानुसार बैलगाडा शर्यत बंदी उठविण्यात यश मिळाले असून बैलगाडा शर्यती सुरु झाल्या आहेत. त्याचबरोबर नारायणगाव, कळंब, मंचर, खेडघाट आणि राजगुरुनगर या ५ बायपासची कामे पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुले झाले आहेत तर आळेफाटा बायपासचे काम प्रगतीपथावर आहे. मागील निवडणुकीत सर्वात कळीचा मुद्दा ठरलेल्या नाशिकफाटा ते चांडोली, तळेगाव चाकण शिक्रापूर आणि पुणे शिरुर या तीनही राष्ट्रीय महामार्गावर एलिव्हेटेड कॉरिडॉर बांधण्यासाठी मंजुरी मिळाली असून या तीनही महामार्गाच्या एकूण 19137.36 कोटींच्या कामांची निविदा प्रक्रिया सुरू आहे. या सर्व कामांच्या पाठपुराव्याची घटनाक्रमासह माहिती या कार्य अहवालात नमूद करण्यात आली आहे.
या आश्वासनांबरोबरच खासदार डॉ. कोल्हे यांनी चाकणला कामगार विमा योजनेचे रुग्णालय व्हावे यासाठी केलेले यशस्वी प्रयत्न, राज्य शासनाने मंजुरी दिलेला महत्वाकांक्षी इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्प, शिवनेरी किल्ल्यावर रोपवे बांधण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात झालेला सामंजस्य करार, कुकडेश्वर मंदिराच्या कळसाच्या कामासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे मंजूर झालेला निधी यासाठीच्या पाठपुराव्याचा सविस्तर प्रवास कार्य अहवालात मांडला आहे.
आकर्षक सजावट असलेल्या आपल्या अहवालात खासदार डॉ. कोल्हे यांनी मतदारसंघातील कामे व विविध प्रकल्पांसाठी केलेल्या प्रयत्नांचा लेखाजोखा मोजक्या शब्दात सादर करताना मतदारसंघात राष्ट्रीय वनौषधी संशोधन संस्था व्हावी यासाठी मिळालेली प्राथमिक मंजुरी, त्यानंतर त्याचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून सादर केलेला सविस्तर डीपीआर, त्याचप्रमाणे गेल्या अनेक वर्षांपासून मतदारसंघातील जनतेने पाहिलेले पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी जीव ओतून प्रयत्न केल्याचे त्यांनी दिलेल्या माहितीवरून जाणवते.
शेतकऱ्यांसाठी संसदेत उठवलेला आवाज व रस्त्यावर उतरून केलेली आंदोलने, मतदारसंघातील 5 लाख नागरिकांचे केलेले मोफत लसीकरण, नागरिकांना वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी आयोजित केलेली शिबीरे, शिवनेरीच्या परिसरात होऊ घातलेली बहुचर्चित शिवसंस्कार सृष्टी, ऐतिहासिक स्थळे जोडणारा शिवशंभु कॉरिडॉर, शिवनेरी किल्ल्यावर कायमस्वरूपी भगवा ध्वज लावावा ही मागणी अशा अनेक प्रकल्पांसाठी योजनाबद्ध पद्धतीने सुरू असलेला पाठपुरावा, मतदारसंघात विविध माध्यमांतून सुरु असलेल्या सुमारे 40 हजार कोटींहून अधिक रकमेच्या विकासकामांची माहिती असा लेखाजोखा खासदार डॉ. कोल्हे यांनी कार्य अहवालात दिला आहे.
थोडक्यात सेलिब्रिटी खासदार म्हणून हिणवणाऱ्या आणि मतदारसंघात काय कामे केली असा प्रश्न विचारणाऱ्या विरोधकांना खासदार डॉ. कोल्हे यांनी आपल्या कार्य अहवालाद्वारे चोख उत्तर दिल्याचे दिसून येते. या कार्य अहवालाचे लवकरच वितरण केले जाणार असून त्याचे संक्षिप्त रुप असलेल्या चार पानी पत्रकाचेही वितरणही येत्या काही दिवसांत केले जाणार आहे. या पत्रकात क्युआर कोड देण्यात आला असून हा क्युआर कोड स्कॅन केल्यावर डिजिटल स्वरुपात संपूर्ण अहवाल पाहता येणार आहे.
इतर महत्वाची बातमी-