पुणे : गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी येरवडा कारागृहात असलेले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णींना मोठा धक्का बसला आहे. डीएसकेंच्या पुणे शहरातील वेगवेगळ्या भागात असलेल्या 350 कोटींच्या आणखी 25 मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी याबाबत माहिती दिली आहे. जप्त केलेल्या सर्व मालमत्तांचा तपशील उपजिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे.

डी एस कुलकर्णी यांच्यासह 8 जण गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत आहेत. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. डीएसकेंनी 33 हजार गुंतवणूकदारांची 2 हजार 91 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार आतापर्यंत डीएसकेंच्या 459 मालमता जप्त करण्यात आल्या आहेत. या मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रियाही सुरु आहे.



नव्याने जप्त केलेल्या 25 मालमत्तांपैकी पुण्यातील धायरीत 12, पिरंगुटमध्ये 5, बाणेरमध्ये 3, बावधन, बालेवाडी येथे प्रत्येकी दोन अशा एकूण 25 मालमत्तांचा समावेश आहे. यामध्ये साधारण 35 एकर जमिनीचाही समावेश आहे. बाजारभावानुसार या जमिनीची किंमत 200 ते 300 कोटी असण्याची शक्यता आहे. या सर्व मालमत्तांचा तपशील उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

डीएसकेंवर गुंतवणूकदारांची फसवणूक करत तब्बल 2 हजार 43 कोटींच्या घोटाळा केल्याचा ठपका ठेवण्यात आला. याप्रकरणी कुलकर्णी दाम्पत्यावर 36 हजार 875 पानांचं दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं. डीएसके आणि हेमंती यांना 17 फेब्रुवारीला अटक झाली होती. आधी दोघंही पोलिस कोठडीमधे होते, त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यामुळे दोघांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली.

डीएसके आणि त्यांची पत्नी हेमंती यांनी केलेल्या पैशांच्या गैरव्यवहारात आणखी तिघांचाही समावेश असल्याचं उघड झालं होतं. डीएसकेंच्या भावाचा जावई केदार वांजपे, त्याची पत्नी (डीएसकेंची पुतणी) सई वांजपे आणि डीएसके कंपनीचा सीईओ धनंजय पाचपोर यांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती. केदार वांजपे हा डीएसकेंच्या कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक होता. ड्रीम सिटीचं अधिग्रहण करण्यात त्याने महत्वाची भूमिका बजावली होती.