पुणे: बदलापूरच्या घटनेवर जयंत पाटलांनी मोठ वक्त्यव्य केल आहे. पोलीस फक्त राज्य सरकारच्या इशाऱ्यावर काम करतात. असं नसतं तर आतापर्यंत शाळा प्रशासनावर कारवाई झाली असती. सरकार लाडकी बहीण योजनेत व्यस्त आहे. मात्र, याच बहिणींच्या मुली असुरक्षित आहे, असे वक्तव्य शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. ते पुण्यात प्रसारमाध्यमांश बोलत होते.


बदलापूरची घटना ही सामान्य माणसाला चीड आणणारी आहे. यावर कोणी राजकारण करायची गरज नाही. लहान बालकं सुरक्षित नाहीत, हे सरकार नाकरते आहे. महिला सुरक्षित नाहीत. एका योजनेमुळे सरकारला असं वाटतेय हीच योजना आपली तारणहार आहे. पण अर्थ खात्याला झोप लागत नसेल. पण आमचा कोणत्याही योजनेला विरोध नाही, असे जयंत पाटील यांनी म्हटले.


मदन भोसले शरद पवार गटात प्रवेश करणार का?


जयंत पाटील यांनी रविवारी सकाळी साताऱ्यात भाजप नेते मदन भोसले यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. त्यामुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले होते. याबाबत छेडले असता जयंत पाटील यांनी म्हटले की, मी त्यांना भेटलो, पण ते प्रवेशबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. मी त्यांच्याकडे चहाला गेलो होतो, असे जयंत पाटील यांनी सांगितले. तर भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशाबाबतही जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देणे टाळले. अजून आम्ही इंदापूरपर्यंत पोहचलो नाही, असे त्यांनी म्हटले. यावेळी त्यांनी शरद पवार गटातील राजकीय इनकमिंगबाबतही भाष्य केले. आज पक्षात साहित्यिक आणि अभिनेते यांचा प्रवेश झाला. मोठ्या प्रमाणात आमच्याकडे लोक प्रवेश करत आहेत. अनेक लोकांना शरद पवारांच्या नेतृत्वात काम करायचे आहे, असेही जयंत पाटील यांनी म्हटले.


राज ठाकरे हॅमरिंग करतात: जयंत पाटील


मनसेप्रुख राज ठाकरे यांनी अलीकडे शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून त्यांनी महाराष्ट्रात जातीयवादाचा खेळ सुरु केला, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. या टीकेला जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले होते. राज ठाकरे जे आरोप करतात, त्या आरोपात कोणताही तथ्य नाही. ते सारखं हॅमर करत राहतात, असा दावा जयंत पाटील यांनी केला.


आणखी वाचा


'स्वातंत्र्यानंतर मोदी सरकार इतकं काम कोणी केलं नाही'; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा छातीठोक दावा