पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार  (Sharad Pawar) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार हे विधानसभेपुर्वी एकत्र येऊ शकतात, असे सूतोवाच करणारे अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनकेंनी आता थेट शरद पवारांच्या स्वागतासाठी फ्लेक्स झळकवले आहेत. आज जुन्नर विधानसभेत शरद पवार  (Sharad Pawar) आलेत, त्यांचं स्वागत अजित पवारांचे आमदार अतुल बेनके यांनी केलं आहे. इतकंच नव्हे तर नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राची पाहणी करण्यासाठी शरद पवार पोहचले, तेंव्हा स्वतः बेनके तिथं हजर होते. 


अतुल बेनकेंनी जुलै महिन्यात खासदार अमोल कोल्हेच्या घरात शरद पवारांची  (Sharad Pawar) भेट घेतली होती. त्यावेळी राजकारणात काहीही घडू शकतं, पवार काका-पुतणे विधानसभेपुर्वी एकत्र येऊ शकतात. असे सूतोवाच बेनकेंनी केले होते. त्यानंतर शरद पवार आज जुन्नर विधानसभेत आले आणि बेनकेंनी त्यांच्या स्वागतासाठी फलक झळकवले, यावेळी त्यांनी पुन्हा एकदा शरद पवारांची भेटही घेतली. यावेळी त्यांची पवारांसोबत काही चर्चा झाली का? याबाबतची कोणती ही माहिती समोर आलेली नाही. मात्र यानिमित्ताने बेनकेंच्या डोक्यात नेमकं काय शिजतंय? अशी चर्चा जुन्नर विधानसभेत रंगलेली आहे.


अतुल बेनकेंनी घेतली शरद पवारांची भेट


आज शरद पवार हे उत्तर पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुका दौऱ्यावर आहेत. शरद पवारांचा जुन्नर तालुक्यातील दौरा सुरू असताना कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी भेट घेतली असून जुन्नरच्या राजकारणात ही भेट चर्चेचा विषय ठरली आहे. आज झालेल्या या भेटीमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे, आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अतुल बेनके तुतारी हाती घेणार का? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


आधीही अमोल कोल्हेंच्या घरी घेतली होती भेट


या आधी जुलै महिन्यात अतुल बेनके यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली होती.खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या निवासस्थानी ही भेट पार पडली होती. अमोल कोल्हे यांच्या निवासस्थानी अतुल बेनके आणि शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट झाली.


शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ शकतात असं वक्तव्य बेनकेंनी केलेलं 


अमोल कोल्हेंच्या घरी झालेल्या भेटीनंर शरद पवार यांच्या भेटीनंतर अतुल बेनके यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. 'राजकारणात काहीही घडू शकते. अगदी शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवारही एकत्र येऊ शकतात. त्यामुळे पुढे काहीही घडू शकते, असं आमदार अतुल बेनके यांनी म्हटलं होतं.