जळगाव : एक महिला लखपती झाली तर पूर्ण परिवाराचे भाग्य बदलते. भारत जगाची तिसरी ताकद बनत आहे. त्यात महिलांचे मोठे योगदान आहे. याआधी अशी स्थिती नव्हती. मागील सरकारचे 7 दशक आणि मोदी सरकारचे 10 वर्ष तराजूत तोला. स्वातंत्र्यानंतर मोदी सरकार इतके काम कोणी केले नाही, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केला. जळगाव येथे आयोजित लखपती दीदी (Lakhpati Didi) कार्यक्रमातून ते बोलत होते. 


महाराष्ट्रातील माझ्या बंधू भगिनींना जय श्रीकृष्ण. उद्या श्रीकृष्ण जयंती आहे मी तुम्हाला आजचं शुभेच्छा देतो, असे मराठीत म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. ते पुढे म्हणाले की, नेपाळ बस दुर्घटनेत आपण जळगावातील अनेक सहकाऱ्यांना गमावले. जेव्हा ही घटना घडली भारत सरकारने त्वरित नेपाळ सरकारचे संपर्क साधला. आपण मंत्री रक्षा खडसे यांना त्वरित नेपाळला जाण्यास सांगितले. दुर्घटनेत मृत पावलेल्या लोकांचे मृतदेह आपण विशेष विमानाने परत आणले. जे जखमी आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमी लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. पीडित कुटुंबियांना केंद्र आणि राज्य सरकारकडून पूर्ण मदत मिळणार आहे. 


लाखो बहिणींना लखपती दीदी बनण्यासाठी मदत मिळणार 


आज लखपती दीदीचे हे महासंमेलन पार पडत आहे. माझ्या सर्व लाडक्या बहिणी येथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आज इथून देशभरातून लाखो बहिणींसाठी सहा हजार करोड रुपयांची राशी जारी करण्यात आली आहे. लाखो बचत गटांनी जोडल्या गेलेल्या महाराष्ट्रातील बहिणींना सुद्धा कोट्यावधी रुपयांची मदत मिळाली आहे. या पैशांनी लाखो बहिणींना लखपती दीदी बनण्यासाठी मदत मिळणार आहे. माझ्या सर्व माता आणि भगिनींना शुभेच्छा.


जगभरात महाराष्ट्राचे दर्शन 


तुमच्याकडे पाहून महाराष्ट्रातील गौरवशाली सांस्कृतिक आणि संस्काराचे दर्शन होत आहे. महाराष्ट्राचे संस्कार भारत नाही तर जगभरात पसरलेले आहे. मी कालच परदेश दौऱ्यावरून परत आलो आहे. मी युरोपच्या देशात पोलंड येथे गेलो होतो. तिथेही मला महाराष्ट्राचे दर्शन झाले. महाराष्ट्राची संस्कृती येथील संस्काराचे दर्शन झाले. पोलंडचे लोक महाराष्ट्रातील लोकांचा खूप सन्मान करतात. इथे बसून तुम्ही याबाबतची कल्पनाही करू शकत नाही. तेथील राजधानीत एक कोल्हापूर मेमोरियल आहे. पोलंडच्या लोकांनी मेमोरियल कोल्हापुरातील लोकांची सेवा आणि सत्काराच्या भावनेने सन्मान देण्यासाठी बनवलेले आहे. काही लोकांना माहिती असेल की, दुसऱ्या विश्वयुद्धाच्या दरम्यान पोलंडच्या हजारो माता आणि बालकांना कोल्हापूरच्या राज परिवाराने शरण दिले होते. जेव्हा महाराष्ट्राची सन्मान कथा ऐकत होतो तेव्हा माझा माथा गौरावपणे उंच झाला. 


तुमच्यात मी जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांची छाप बघतो


जळगाव ही महान संत मुक्ताईची भूमी आहे. बहिणाबाईची कविता प्रेरित करत आली आहे. मातृशक्तीचे योगदान अप्रतिम आहे. शिवाजी महाराजांना दिशा देण्याचे काम माँ जिजाऊने केले. सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिक्षण दिले. समाज आणि राष्ट्रासाठी इथल्या मतांनी योगदान दिले. महाराष्ट्र मधील बहिणी किती चांगले काम करत आहेत. तुमच्यात मी जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांची छाप बघतो, असे त्यांनी यावेळी म्हटले. 


स्वातंत्र्यानंतर मोदी सरकार इतके काम कोणी केले नाही


मागील एक वर्षात 1 करोड लखपती दीदी झाल्यात. मागील दोन महिन्यांत 11 लाख झाल्यात. महाराष्ट्र सरकारने ही यात मोठे योगदान दिले. लखपती दीदी हे अभियान येणाऱ्या पिढीला सशक्त करणारे अभियान आहे. मुलगी जेव्हा कमवायला लागते तर तिचा अधिकार, मान सन्मान वाढतो. एक महिला लखपती झाली तर पूर्ण परिवाराचे भाग्य बदलते. भारत जगाची तिसरी ताकद बनत आहे. त्यात महिलांचे मोठे योगदान आहे. याआधी अशी स्थिती नव्हती. छोटं मोठं काम करण्याची इच्छा असूनही करता येत नव्हते. काही झाले तरी माता बहिणींची समस्या दूर करण्याचा निर्धार आम्ही केला. मागील सरकारचे 7 दशक आणि मोदी सरकारचे 10 वर्ष तराजूत तोला. स्वातंत्र्यानंतर मोदी सरकार इतके काम कोणी केले नाही. आज घर महिलांच्या नावावर होत आहे. जनधन खाते उघडले आहे. मुद्रा योजनेत बिना गॅरंटीचे कर्ज द्या, गॅरंटी पाहिजे तर मोदी आहे, असे त्यांनी यावेळी म्हटले.