पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळ अर्थात PMPML चे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी सूत्र हाती घेताच धडाकेबाज कामगिरी सुरु केली आहे. गेल्या काही दिवसात त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. असाच एक महत्वाचा निर्णय आज (बुधवार) मुंढेंनी घेतला आहे.


पीएमपीएमएलच्या कामगारांना यापुढे ओव्हरटाईम करु नये असा आदेश मुंढेंनी काढला आहे. जरी कामगारांनी ओव्हरटाईम केला तरीही त्याचा पगार मात्र त्यांना मिळणार नाही. असंही मुंढेंनी स्पष्ट केलं आहे.

या निर्णयामुळे आता पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या ओव्हरटाईमला फुलस्टाप मिळणार आहे. पीएमपीएमएलचे  एकूण 9700 कर्मचारी असून या सर्वांना हा नियम लागू करण्यात आला आहे.

दरम्यान, पीएमपीएमएलला काही मार्गांवर उत्पन्न मिळत नसल्याचं कारण देऊन कोणतीही पूर्वसूचना न देता 27 मार्गांवरील 38 बस बंद केल्याचा आरोप पीएमपीएल प्रवासी मंचने काल केला.

पीएमपीएमएलची बससेवा नफ्यासाठी नसून, प्रवाशांच्या सेवेसाठी असल्याने तुकाराम मुंढे यांनी प्रवासी केंद्रीत विचार करावा, अशी मागणीही प्रवासी मंचातर्फे करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांनी इतर चांगले निर्णय घेतले त्याचं स्वागत करतो, पण चालू मार्ग बंद करू नये, अशी मागणी प्रवासी मंचाने केली आहे.

सूत्रं स्वीकारताच पहिला झटका

तुकाराम मुंढे यांनी 29 मार्चला PMPML चा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी कामचुकार कामगारांवर कारवाई सुरु केली.  दोनच दिवसात म्हणजे 1 एप्रिलला त्यांनी पहिला झटका दिला.

रात्री पुणे स्टेशन आणि कोथरुड डेपोमध्ये गाडयांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामावर असलेले 9 कर्मचारी झोपल्याचं भरारी पथकाला आढळून आलं. मात्र ही डुलकी या कर्मचाऱ्यांना महागात पडली. या 9 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश तुकाराम मुंढे यांनी दिले.

शहरात एकूण 13 डेपो असून रात्रीच्या वेळेत झोपणाऱ्या कर्माचाऱ्यांवर कारवाईचे आदेश तुकाराम मुंढे यांनी प्रशासनास दिले होते.  त्यासाठी त्यांनी भरारी पथकं नेमली आहेत.

महापौरांना झटका

महापालिकेतील विषय समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या निवडणूक शुक्रवारी 7 एप्रिलला होती. त्यासाठी तुकाराम मुंढे यांची पीठासीन आधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या निवडणुकीसाठी महापौर, उपमहापौर, सर्व पक्षांचे गटनेते उपस्थित असतात. अशी महापालिकेची परंपरा आहे.

तुकाराम मुंढे यांनी मात्र समीतीचे सदस्य असलेल्या नगरसेवकांशिवाय इतरांना उपस्थित राहण्यास मनाई केली. त्याला नगरसेवकांनी हरकत घेतली. त्यानंतर महापौर आणि गटनेत्यांना उपस्थित राहण्यास मुंढे यांनी परवानगी दिली. मात्र, या सर्वांना बाजूला एका कोपर्‍यात बसावं लागेल, असं मुंढे यांनी सांगितले. त्यामुळे महापालिकेत येऊनही महापौर मुक्ता टिळक यांनी या निवडणुकीला जायचं टाळलं.