पुणे : वाहतूक पोलिसांना दमदाटी करत सरकारी कामात अडथळा आणल्यामुळे अटकेत असलेले पुण्यातील भाजपचे नगरसेवक अमोल बालवडकर यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.

25 एप्रिल पर्यंत त्यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. अमोल बालवडकर हे जबाबदार नागरिक असून नगरसेवक आहेत, त्यांन जामीन द्यावा, असा युक्तीवाद त्यांच्या वकिलाने कोर्टात केला.

न्यायमूर्तींनी या युक्तीवादावर चिडून कायदा हा सर्वांसाठी समान असतो, असं सांगत जामीन अर्ज फेटाळला. शिवाय येरवडा कारागृहात त्यांची रवानगी करण्याचे आदेश दिले. त्यामुळे अमोल बालवडकर यांचा मुक्काम 25 एप्रिलपर्यंत येरवडा कारागृहात असेल.

काय आहे प्रकरण?

गाडी नो पार्किंगमध्ये उभी असताना पोलिसांनी जॅमर लावल्याने पुण्यातील भाजप नगरसेवक चांगलेच संतापले. बाणेर बालेवाडी प्रभागाचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अमोल बालवडकर यांनी जेएम रोड येथे गाडी नो पार्कींगमध्ये उभी केली होती. वाहतूक पोलीसांनी गाडीला जॅमर लावल्याने अमोल बालवडकर यांनी पीआय शंकर ढामसे यांना दमदाटी केली.

दमदाटी केल्यानंतर वरिष्ठ पोलिसांना फोन करून पीआय ढामसे यांनी दारू पिऊन माझ्या गाडीवर कारवाई केल्याचंही अमोल बालवडकर यांच्याकडून सांगण्यात आलं, अशी माहिती पोलिसांनी दिली.

अमोल बालवडकर यांच्यावर याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये कलम 353 अंतर्गत दमदाटी करणे, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

संबंधित बातमी : गाडीला जॅमर लावल्याने भाजप नगरसेवकाचा संताप, पोलिसांना दमदाटी