पुणे : मुंबईत शिवस्मारकाचं भूमिपूजन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात पोहोचले. पुणे मेट्रोचं भूमिपूजन पंतप्रधान मोदींच्या हस्ते झालं. यावेळी पंतप्रधानांनी शहरीकरण, काळा पैसा अशा सर्व मुद्द्यांवर तुफान फटकेबाजी केली.

शरद पवारांचीही उपस्थिती

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

काळा पैसेवाल्यांना मोदींचा इशारा

काळा पैसावल्यांना पंतप्रधान मोदींनी पुण्यातूनही इशारा दिला. 50 दिवसांनंतर बेईमान लोकांचा त्रास वाढणार असल्याचं सांगत काळा पैसावाल्यांना उद्देशून म्हणाले, “अजूनही वेळ गेलेली नाही. काळा पैसा सरकारजमा करा.”

आधीच्या सरकारला टोला

पुणे मेट्रोचं भूमिपूजन करताना पंतप्रधान मोदींनी आधीच्या सरकारवर टीका केली. मोदी म्हणाले, “पुणे मेट्रोचं काम आधीच झालं असतं, तर खर्च कमी आला असता.” शिवाय, आधीच्या सरकारने चांगली कामं माझ्यासाठी बाकी ठेवली आहेत, ते पूर्ण करण्याचे भाग्य लाभलं असल्याचं सांगत विरोधकांना टोला लगावला.

गावांच्या विकासाला प्राधान्य : मोदी

“शहरासारख्या सुविधा गावांनाही मिळाल्या तर लोक गावं सोडणार नाहीत. गावांचा विकास झाल्यास शहरांवरील ओझं वाढणार नाही. डिजिटल इंडिया शहरांसोबतच गावांसाठीही आहे. गावांच्या विकासाला प्राधान्य देत आहोत.” असे पंतप्रधान मोदी म्हणाले. शिवाय, आत्मा गावाचा असावा आणि सुविधा शहरांसारख्या असाव्यात, असेही मोदींनी यावेळी सांगितले.

mobile flash


मोबाईलचा फ्लॅश ऑन करुन मोदींचे आभार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे पुणेकरांना मेट्रो मिळणार आहे, असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी मोदींचे आभार मानण्यासाठी पुणेकरांना अनोखं आवाहन केलं. उपस्थितांना मोबाईलचा फ्लॅश ऑन करायला सांगून मोदींचे आभार मानण्याची विनंती केली. त्यानंतर उपस्थित पुणेकरांनी मोबाईलचा फ्लॅश ऑन केला आणि मोदींचे आभार मानले.

(PHOTO : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत फुले पगडी देऊन करण्यात आले.)

शरद पवारांना भाषणाची संधी नाही

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पुणे मेट्रोच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींसोबत व्यासपीठावर बसण्याची संधी मिळाली. मात्र, त्यांना भाषण करण्याची संधी देण्यात आली नाही. याबाबत राष्ट्रवादीच्या गोठातून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, पवारांना भाषणाची संधी न दिल्याने राष्ट्रावादीच्या गोठात नाराजी असेल, यात शंका नाही.