PM Modi in Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुणे मेट्रो लोकार्पण कार्यक्रमात भाषण करताना शहरातील नागरिकांना आवाहन केले आहे. शहरातील नागरिकांनी वर्षातून किमान एकदा नदी उत्सव साजरा करावा असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मुळा-मुठा नदी प्रकल्पांच्या पुनरुज्जीवन आणि प्रदूषण निवारण प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. त्या अनुषंगाने त्यांनी नागरिकांना आवाहन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, प्रदूषण आणि पुराला रोखण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. मुळा मुठाच्या प्रकल्पासाठी महापालिकेला केंद्र सरकारकडूनही मदतीचा हात देण्यात येत आहे. शहरातील नदी स्वच्छ झाल्यास, त्याचे सौंदर्यकरण झाल्यास त्याचा फायदा नागरिकांना होणार आहे. नदी पुन्हा जिवंत झाल्यास नागरिकांमध्ये एक नवचैतन्य, उत्साह निर्माण होईल. नदीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी नागरिकांनी वर्षातील एक दिवस ठरवून नदी उत्सव साजरा करावा असे आग्रही आवाहन पंतप्रधानांनी केले. या महोत्सवात नदी प्रति असलेली श्रद्धा व्यक्त करता येईल. त्याशिवाय नदी, पर्यावरणाचे महत्त्व आदीचे सांगता येईल. यानिमित्ताने जनजागृती मोहीम राबवता येईल असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटले की, पुण्याची ओळख ग्रीन फ्यूल सेंटर म्हणून निर्माण होत आहे. परदेशातील कच्च्या तेलाचे अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू होते. त्याचाच एक भाग म्हणून इथेनॉलचा वापर वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल असेही त्यांनी म्हटले.
समाजातील सर्वच घटकांनी विशेषत: श्रीमंतांनी मेट्रोतून प्रवास करण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी केले. मेट्रोतून प्रवास करणे शहराला एक प्रकारे मदत करण्यासारखे आहे. 21 व्या शतकातील शहरांच्या गरजा आणि विकास लक्षात घेऊन सरकार धोरण आखत आहे. सरकार अधिकाधिक ई-वाहनांच्या वापरासाठी प्रोत्साहन देत आहे. अत्याधुनिक पद्धतीने घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रियेची व्यवस्था, बायोगॅस प्लांट, स्मार्ट एलईडी बल्बचा अधिक वापर व्हावा यासाठीच्या धोरणांवर सरकारकडून काम सुरू असल्याचे त्यांनी म्हटले.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- PM Modi in Pune : आधी भूमिपूजन व्हायचं मात्र उद्घाटन कधी होणार हे माहिती पडायचं नाही; मेट्रो लोकार्पणानंतर पंतप्रधानांचा टोला
- महत्वाच्या पदावरील व्यक्तिंनी अनावश्यक वक्तव्य करु नये, पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत अजित पवारांचा टोला